नान्नज : विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांची होणार चौकशी | पुढारी

नान्नज : विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांची होणार चौकशी

नान्नज : पुढारी वृत्तसेवा :  जामखेड तालुक्यात सामाजिक विशेष सहाय्य योजनेंतर्गत यापूर्वी मंजूर असलेले अपंग, विधवा, निराधार, संगांयो, इंगांयो व श्रावणबाळ आदी योजनांतील लाभार्थ्यांची चौकशी जामखेड तहसीलने हाती घेतली आहे. या चौकशीअंती शेकडो लाभार्थी अपात्र ठरण्याच्या मार्गावर असून, या योजनेतील अनेक लाभार्थ्यांनी आपल्या खात्यात जमा झालेली रक्कम न उचलल्यामुळे जामखेड तालुक्यातील बँकांनी लाखो रुपये जामखेड तहसीलला परत केले आहेत.

जामखेड तालुक्यात एकूण 87 गावे, 58 ग्रामपंचायती व 1जामखेड नगरपरिषद आहे. सामाजिक विशेष सहाय्य योजनेत तालुक्यात एकूण 6 हजार 420 लाभार्थी आहेत. या योजनेतून प्रतिलाभार्थी एक हजार रुपये दरमहा थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान देण्यात येते. काही लाभार्थी मृत, अनेक लाभार्थी स्थलांतरित झाले आहेत. शेकडो लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्यात जमा झालेले अनुदान न उचलल्यामुळे लाखो रुपये बँकांनी तहसीलकडे परत केले आहेत. या लाभार्थ्यांनी तीन महिन्यांच्या आत आपल्या खात्यात जमा झालेले अनुदान काढणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांनी अनुदानाची रक्कम काढलेली नाही.

त्यामुळे बँकांनी हे पैसे तहसीलला परत केले आहेत. काही महिन्यांपूर्वी लोकप्रतिनिधींनी गावोगावी निराधार, विधवा, अपंग, परित्यक्त्या लाभार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता जामखेड तहसीलने शासन निर्णयानुसार या योजनेतील सर्व लाभार्थ्यांची चौकशी करून त्यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतल्याने या योजनेतील अनेक लाभार्थी अपात्र ठरण्याच्या मार्गावर आहेत.

जामखेड तालुक्यात सामाजिक विशेष सहाय्य योजनेंतर्गत मंजूर असलेल्या योजनेतील सर्व लाभार्थींची शोध घेण्याची मोहीम मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यामार्फत गावोगावी राबविण्यात आली असून या योजनेत अपात्र ठरणार्‍या लाभार्थ्यांचे शासन निर्णयानुसार अनुदान बंद करण्यात येणार आहे.
                                                       – योगेश चंद्रे , तहसीलदार, जामखेड

Back to top button