सोनई : बुडणार्‍या दाम्पत्याला वाचविले ; खेडलेपरमानंद येथील धाडसी तरुणाचा सत्कार | पुढारी

सोनई : बुडणार्‍या दाम्पत्याला वाचविले ; खेडलेपरमानंद येथील धाडसी तरुणाचा सत्कार

सोनई : पुढारी वृत्तसेवा :  दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील तुवर वस्तीलगत ओढ्याला मोठा पूर आला होता. या पुरात वाहून जात असलेल्या शेतकरी दाम्पत्यासह त्यांच्या बैलांना तरूणाने धाडस दाखवून वाचविले. त्याच्या धाडसाचे कौतुक करीत ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नेहमीप्रमाणे रमेश तुवर व दमयंती तुवर हे शेतकरी दाम्पत्य बैलगाडी घेऊन आपल्या करजगाव शिवारातील शेतामधून चारा आणण्यासाठी गेले होते. परत माघारी फिरताना ओढ्यावरील डांबरी रस्त्यावर बैलाचा पाय घसरला व वाहत्या पाण्यात बैलगाडीसह तुवर पती-पत्नी बुडाले. शेजारी मोटारसायकल धुण्यासाठी आलेल्या खेडले परमानंद येथील युवक किरण गांगवे याने हे दृश्य पाहिले. क्षणाचाही विलंब न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन त्याने प्रथम दमयंती तुवर यांना व नंतर लगेच रमेश तुवर यांना पाण्याबाहेर काढत त्यांचे जीव वाचविले. नंतर बैलाजोडीला व्यवस्थित पाण्याबाहेर घेतले.

यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी त्या ठिकाणी झाली होती. स्वतःचा जीव धोक्यात घालून किरण गांगवे याने तुवर पती-पत्नीचा जीव वाचविला. याबद्दल शिरेगाव व खेडले परमानंद, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, माजी सभापती सुनील गडाख मित्रमंडळ, उदयन गडाख मित्रमंडळ यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.  याप्रसंगी मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, अल्लूभाई इनामदार, पांडुरंग बोर्डे, विजय जाधव, किरण जाधव, दादासाहेब रोठे, दगुबाबा हवालदार, मंडल अधिकारी माने, संभाजी शिंदे, अन्वर इनामदार, अविनाश जाधव, विजय जाधव, संकेत तुवर, पांडुरंग जाधव, किरण दरंदले, ज्ञानेश्वर जाधव, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.

Back to top button