

करंजी : पुढारी वृत्तसेवा : अडीच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. अनेक शेतकरी हिताचे निर्णय यामध्ये घेण्यात आले; परंतु 50 खोके घेऊन बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या विचाराशी प्रतारणा करणार्या लोकांमुळे राज्यातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. प्रस्तावित पुणे-औरंगाबाद महामार्गासाठी हजारो कोटी रुपये खर्च होणार असून, या महामार्गाला आपला विरोध असल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. तसेच, सर्वसामान्य जनतेमध्ये या सरकारविषयी तीव्र नाराजगी असून, विकासावर सरकार काहीच बोलत नाही, अशा शब्दात आमदार तनपुरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी, मांडवे, जोडमोहोज परिसरात मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या वांबोरी चारीच्या पाण्याची पाहणी करण्यासाठी व जलपूजनासाठी आमदार तनपुरे यांनी शनिवारी दौरा केला. मांडवे येथे शेतकर्यांशी संवाद साधला. आमदार तनपुरे म्हणाले, मुंबई-अलाबाद बुलेट ट्रेनसाठी सहा हजार कोटी रुपये राज्य सरकारने देण्याचे काम केले. हे सहा हजार कोटी रुपये जर महाराष्ट्रातील जे रस्ते सध्या पावसामुळे अतिशय खराब झाले आहेत. त्या रस्त्यांच्या कामासाठी वापरले असते, तर एक लाख किलोमीटरचे रस्ते या पैशातून डांबरीकरणाने जोडता आले असते.
नवीन पुणे-औरंगाबाद महामार्गासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन या सरकारचे आहे. या महामार्गाला आपला विरोध असून, राज्यमार्ग, महामार्ग खड्डे मुक्त करा मग नवीन महामार्गाचे धोरण घ्या. महामार्गासाठी शेतकर्यांच्या जमिनी अधीग्रहण केल्या जातात; मात्र त्यांना पुरेसा मोबदला मिळत नाही. वांबोरी चारीचे पाणी प्रत्येक लाभधारक तलावात पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबर प्रसाद शुगरच्या कर्मचार्यांच्या माध्यमातून या योजनेची कुठे फुटतूट होऊ नये, यासाठी योग्य नियोजन केले. राज्यात आपली सत्ता जरी नसली, तरी विकास कामात कुठे कमी पडणार नाही. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, सरपंच अमोल वाघ, राजेंद्र लवांडे, अध्यक्ष मच्छिंद्र सावंत, तुकाराम वांढेकर, अनिल रांधवणे राजेंद्र म्हस्के आदी उपस्थित होते.