मोहटा देवीच्या चरणी दोन कोटींचे दान ; शारदीय महोत्सवात यंदा भाविकांच्या संख्येत वाढ | पुढारी

मोहटा देवीच्या चरणी दोन कोटींचे दान ; शारदीय महोत्सवात यंदा भाविकांच्या संख्येत वाढ

अमोल कांकरिया : 

पाथर्डी तालुका : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त राज्याच्या विविध भागांतून येणार्‍या भाविकांच्या संख्येत यंदा भरघोस वाढ झाल्याने देणगीरुपाने अवघ्या पंधरा दिवसांत मोहोटा देवीच्या चरणी दोन कोटींचे दान अर्पण केले आहे.दानपेटीत रोख स्वरूपात 1 कोटी 27 लाख 60 हजार रुपयांच्या रोख रकमेसह, चारशे ग्राम सोने, सुमारे चौदा किलो चांदी व चांदीची छत्री, इतर व रोख, ऑनलाईन देणगी असे सर्व मिळून 2 कोटींहून अधिक भरघोस दान भाविकांनी देवीला अर्पण केले.

दोन दिवस चाललेल्या मोजणीत नगर येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे डॉ.डी. एस.आंधळे,देवस्थान समितीचे विश्वस्त, कर्मचारी, रेणुका विद्यालयाचे शिक्षक,पाथर्डी येथील सराफ काशिन्नाथ वामन शेवाळे, पोलिस व देवस्थान सुरक्षा असे सुमारे शंभर कर्मचारी सहभागी झाले होते. नवरात्रोत्सव कालावधीत भाविकांनी दानपेटीत टाकलेल्या रकमेची मोजदाद सीसीटीव्ही कॅमेरेच्या निगराणीखाली मंदिराच्या मुख्य हॉलमध्ये करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, सहायक भीमराव खाडे व कर्मचारी उपस्थित होते.
महोत्सवात मूळचे शेडगाव (ता. संगमनेर) येथील देवीभक्त व मुंबई येथील बी. जे. ऑटोमेशनचे संचालक उद्योजक बाबूराब सांगळे यांनी देवस्थानास सुमारे 3 लाख रुपये किमतीची अद्ययावत सीसी टीव्ही संच देणगी स्वरुपात अर्पण केला, अशा विविध स्वरुपात रुपये 2 कोटींच्यावर उच्चांकी देणगी देवस्थानास प्राप्त झाली.

यावर्षी शारदीय नवरात्र महोस्तवासाठी नगरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे चेअरमन तथा अहमदनगर चे जिल्हा न्यायाधीश-1 सुनील गोसावी , पाथर्डीच्या दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त अश्विनी बिराजदार, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, तहसीलदार श्याम वाडकर, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, विश्वस्त भीमराव पालवे, अशोक विक्रम दहिफळे, अशोक भगवान दहिफळे, आजिनाथ आव्हाड, सरिता दहिफळे,अ‍ॅड. विजयकुमार वेलदे, अ‍ॅड. सुभाष काकडे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, सतीश वैद्य, सुधीर लांडगे यांनी भाविकांना विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या. नवरात्रोत्सवाचे चांगले नियोजन करण्यात आल्यामुळे भाविकांनी विविध सोयीसुविधांचा लाभ प्रभावीपणे घेतला. नवरात्रोत्सव काळात भाविकांना दर्शनासाठी मंदिर अहोरात्र खुले ठेवण्यात आले होते.

शारदीय नवरात्रोत्सव शांततेत संपन्न होण्यासाठी सर्व घटकांनी देवस्थानला सहकार्य केल्याबद्दल देवस्थानचे अध्यक्ष सुनील गोसावी यांनी सर्वांचे विशेष आभार मानल्याचे देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी सांगितले.

रोख रकम, सोने-चांदीची अशी मिळाली देणगी
यावेळी रोख 1 कोटी 27 लाख 60 हजार 554 रुपये, तसेच सोने 40 तोळे मूल्य 16 लाख 64 हजार रुपये,चांदी वस्तू 13 किलो 810 ग्रम मूल्य 5 लाख 13 हजार 992 रुपये, चांदीचे छत्र व पंचारती मूल्य 3 लाख रुपये, तसेच विविध देणगी पावती 40 लाख 29 हजार 930 रुपये, ऑनलाइन स्वरुपात देणगी रुपये 4 लाख 86 हजार 203 रुपये प्राप्त झाले.

Back to top button