नगर : ट्रक-टाटा टेम्पोची भीषण धडक ; पाच जण गंभीर जखमी, ‘108’ ठरली जीवनदायिनी | पुढारी

नगर : ट्रक-टाटा टेम्पोची भीषण धडक ; पाच जण गंभीर जखमी, '108' ठरली जीवनदायिनी

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील पांगरमल शिवारात गुरुवारी (दि.13) ट्रक -टाटा एस टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पाथर्डीहून पांढरीपुलकडे येणारा ट्रक (एम.एच.16ए. वाय. 8118) व पांढरीपुलाकडून पाथर्डीकडे जाणारा टाटा एस टेम्पो (एम.एच. 12 इ.एफ. 2553) यांची समोरासमोर धडक झाली. पांगरमल शिवारातील वळणावर हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की, टाटा एस टेम्पोची बॉडी गाडीपासून बाजूला उडून गेली होती. टेम्पोमधील सर्व प्रवासी बाहेर फेकले गेले. टेम्पोमध्ये सहा पुरुष व चार महिला प्रवास करत होत्या.

अपघाताची माहिती 108 रुग्णवाहिकेच्या प्रमुख कांचन बिडवे यांना समजताच त्यांनी तत्काळ सर्व यंत्रणा सतर्क करत जेऊर व मिरी येथील रुग्णवाहिकांना घटनास्थळी पाठवले. मिरी येथील 108 रुग्णवाहिकेचे डॉ. अमित आंधळे व चालक शरद क्षीरसागर व जेऊर येथील डॉ. सचिन कोरडे व चालक भीमराज मोकाटे यांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात तत्परता दाखवली. सर्व जखमींवर नगरमध्ये काही खासगी, तर काही रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रमेश थोरवे यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.

108 रुग्णवाहिका व पोलिसांचे कौतुक
108 रुग्णवाहिका प्रमुख कांचन बिडवे यांच्या सतर्कतेमुळे जखमींवर तत्काळ उपचार सुरू झाले, तर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार रमेश थोरवे घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्याने ट्रक चालकास होणारी मारहाण टळली. पुढील अनुचित प्रकार टळल्याने 108 रुग्णवाहिका प्रमुख बिडवे व पोलिस थोरवे यांच्या कार्याचे नागरिकांनी कौतुक केले.

अपघातातील जखमी प्रवासी
ट्रक चालक बाबुराव आसाराम ढाकणे (वय 31, रा. खरवंडी कासार, ता. पाथर्डी) याला वळणाचा अंदाज न आल्याने अपघात घडल्याची चर्चा होती. टेम्पोमधील उत्तम ज्ञानदेव म्हस्के, ज्ञानेश्वर भीमराज पवार, मीना उत्तम म्हस्के ( सर्व रा.माहेगाव, ता. राहुरी) व अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पो मधील सर्व प्रवासी स्वाध्याय परिवारातील भाविक होते.

Back to top button