श्रीरामपूर- नेवासामार्गे वाहतूक वळवून आणखी किती बळी घेणार? नागरिकांचा सवाल | पुढारी

श्रीरामपूर- नेवासामार्गे वाहतूक वळवून आणखी किती बळी घेणार? नागरिकांचा सवाल

कैलास शिंदे : नेवासा : नगर – मनमाड रस्त्याची वाहतूक बाभळेश्वर – श्रीरामपूरमार्गे नेवासा रस्त्याने वळवून आणखी किती बळी घेणार असा सवाल? नागरिकांमधून होत आहे. नगर – मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीमुळे या रस्त्यावरील वाहतूक 15 ते 30 ऑक्टोबर दरम्यान बाभळेश्वर- श्रीरामपूर- नेवासामार्गे नगर अशी वळविण्यात आली आहे. हा पर्यायी मार्ग म्हणून निवड केलेला बाभळेश्वर – श्रीरामपूर – नेवासा फाटा हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. रस्त्यावरील खड्डे अनेक वर्षांपासून बुजवलेले नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत येथे दररोज अपघात होतात आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.

नेवासा फाट्याजवळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या ठिकाणी झालेल्या अपघातात आतापर्यंत पाच नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यामध्ये सहा वर्षांच्या एका बालिकेचा समावेश होता. सध्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन्ही बाजुंनी हा रस्ता खोदलेला आहे. त्यात दुचाकी – चारचाकी वाहने पडून नियमित अपघात होतात.

दिवाळीच्या तोंडावर नको!
दिवाळीचा सण जवळ आल्याने यावर वाहतुकीचा अधिकच ताण पडणार आहे.दिवाळी सणामध्ये लोकांना जीव गमवावा लागू नये यासाठी प्रशासनाने रस्ता दुरुस्तीचे काम दिवाळीनंतर करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे, अतिरिक्त वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यापूर्वी पर्यायी मार्ग असलेल्या बाबळेश्वर – श्रीरामपूर – नेवासा फाटा मार्गाची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याचे आदेश संबंधितांना देण्याची नितांत गरज असून, मगच पर्यायी अतिरिक्त वाहतूक वळविण्याचे नियोजन करावे, असे नागरिकांचे म्हणने आहे.

अतिक्रमण काढण्याला मुहूर्त कधी?
नगर – औरंगाबाद महामार्गावर रस्त्याच्या कडेला अतिक्रमणाने वेढा घातलेला आहे. त्यामुळे अपघात घडत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करते आणि अपघाताला आमंत्रण देत असल्याची संतप्त भावना नागरिकांमधून आहे. त्यामुळे नेवासा फाटा येथील महामार्गावरील अतिक्रमण काढण्याची प्रशासनाला मुहूर्त कधी मिळणार? असा सवालही उपस्थित केला जातोय.

अशी या रस्त्याची वाईट अवस्था असताना या मार्गावरून अतिरिक्त वाहतूक आणि विशेषतः अवजड वाहतूक वळवली गेल्यास अपघातांची संख्या वाढवून नागरिकांना जीव गमावा लागेल. त्यासोबत या रस्त्याची अवस्था बघून निर्णय घेण्याची गरज आहे.
                           -अ‍ॅड. अशोकराव करडक, सामाजिक कार्यकर्ते, नेवासा

नेवासा – श्रीरामपूर रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून शेवटची घटका मोजतांना दिसतो; रस्त्यातील खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. या रस्त्याची अवस्था अधीच दयनिय असताना दुसरी वाहतुक या रस्त्यावर वळवून अपघाताला निमंत्रण देणारी ठरणार असल्यामुळे याबाबत साकारात्मक दृष्टीकोनातून निर्णय घेण्याची गरज आहे.
                                                           -डॉ. लक्ष्मणराव इंगळे, नेवासा

Back to top button