काम पूर्ण झाल्यानंतर पाणीयोजनेचे हस्तांतरण ; पुणतांबेकरांचा बैठकीत ठाम निर्धार

काम पूर्ण झाल्यानंतर पाणीयोजनेचे हस्तांतरण ; पुणतांबेकरांचा बैठकीत ठाम निर्धार

पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा :  जलस्वराज्य टप्पा 2 या योजनेंतर्गत पुणतांबे येथे सुरू असलेल्या 17 कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणीयोजनेच्या कामात त्रूटी आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण काम झाल्याशिवाय ही योजना हस्तांतरित करण्यात येणार नाही, असा निर्णय जीवन प्राधिकरण अधिकारी व पाणी पुरवठा कमिटी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. पुणतांबे गावाला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणार्‍या पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी नवीन पाणीयोजनेचे जीवन प्राधिकरणमार्फत चार वर्षांपासून काम सुरू आहे, यात 5 कि. मी. अंतराची मुख्य जलवाहिनी, नवीन साठवण तलाव, गावांतर्गत जलवाहिनी, 4 जलकुंभ ही कामे पूर्ण झाली आहेत. काही भागात पाणीपुरवठा सुरू झाला असला, तरी गावाच्या निम्म्यापेक्षा जास्त भागाची पाणी चाचणी अयशस्वी होत आहे. वाढीव जलवाहिनी, मीटर पद्धत, आधुनिक जल शुद्धीकरण यंत्रणा आदी कामे अपूर्ण आहेत. यामुळे पाणी योजनेच्या कामावरून होणार्‍या बैठकीत इतर वेळी होणारे आरोप- प्रत्यारोप करण्यात आले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एम. बी. क्षीरसागर, उपअभियंता ए. एम. कांबळे व शाखा अभियंता बिन्नर यांच्या उपस्थितीत या योजनेच्या कामाबद्दल ग्रामस्थ पदाधिकार्‍यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी सरपंच डॉ धनंजय धनवटे, उपसरपंच ज्योती पवार, सुहास वहाडणे, चंद्रकांत वाटेकरी, नामदेव धनवटे, संध्या थोरात, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर पवार आदी उपस्थित होते. नवीन जलशुद्धीकरण यंत्रणा, वाढीव नळजोडणी, उर्वरित जलवाहिनी, गावांतर्गत रस्ते दुरुस्ती आणि गावाच्या संपूर्ण भागाला तातडीने सुरळीत पाणीपुरवठा ही कामे पुर्ण आणि कामातील त्रुटीस ठेकेदार जबाबदार आहे. अधिकार्‍यांनी सुचनांची दखल घेऊन लवकर योजना कार्यान्वित करुन द्यावी, त्यानंतरच योजना ताब्यात घेतली जाईल, असे डॉ धनवटे यांनी सांगितले.
दरम्यान, योजनेतील त्रुटी व अपुरी कामे लवकर पूर्ण केली जाणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत वाटेकर, नामदेव धंनवटे, विनोद धनवटे यांनी मुद्दे मांडले.

गैरकारभाराच्या चौकशी अहवालाचे काय?
नवीन पाणी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यात गैरकारभार झाला आहे, याची चौकशी करा, अशी मागणी शिवसेनेचे सुहास वहाडणे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मंत्री पाटील यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर अधिकार्‍यांनी येथे भेट देऊन पहाणी करून महिती घेतली. मात्र, चौकशी अहवालाचे काय, याची माहिती द्यावी, अशी मागणी वहाडणे यांनी करून अधिकार्‍यांना धारेवर धरले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news