नगर तालुक्यात लाल कांद्याचे क्षेत्र घटणार ; संततधार पावसाचा फटका

नगर तालुक्यात लाल कांद्याचे क्षेत्र घटणार ; संततधार पावसाचा फटका

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यात लाल कांदा पिकाच्या लागवडीस सुरुवात झाली आहे. परंतु, संततधार पावसामुळे रोपांची वाताहत झाल्याने लाल कांद्याचे क्षेत्र घटणार आहे. तर, गावरान कांदा, गहू, ज्वारी पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. नगर तालुक्यात सर्व दूर पाऊस झाला असून, बहुतांशी तलाव, बंधारे तुडुंब भरले आहेत. नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अकोळनेर येथील वाळूंबा नदी, सारोळा कासार येथील पूर्वा नदी, जेऊर येथील सीना, खारोळी नद्या खळखळून वाहत आहेत. वाळकी येथील धोंडेवाडी तलाव, पिंपळगाव माळवी तलाव, भोरवाडी, कामरगाव, बहिरवाडी येथील वाकी वस्ती तलाव, तांदळी वडगाव तलाव, जेऊर येथील डोणी तलाव, इमामपूर येथील पालखी तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसाने खरीप हंगामातील पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुका गेल्या दशकापासून लाल कांद्याचे पठार म्हणून उदयास येत आहे. परंतु, चालू वर्षी संततधार पाऊस सुरू राहिल्याने तालुक्यातील सुमारे 50 टक्के लाल कांद्याची रोपे वाया गेली. बुरशी, सड, मर अशा विविध रोगांनी, तसेच सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे रोपांची वाताहत झाली.
सद्यस्थितीत लाल कांद्याची लागवड जोरात सुरू आहे. परंतु, रोपांअभावी लाल कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटणार आहे. एक पायली रोपाची किंमत 30 ते 40 हजार रुपये सांगितली जाते. तरी देखील रोपं मिळत नाहीत.

तालुक्यातील जेऊर पट्टा लाल कांदा उत्पादनात अग्रेसर असतो. परंतु, जेऊर मंडळात तालुक्यात सर्वांत अधिक पाऊस झाल्याने येथील कांद्याच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे चालू वर्षी जेऊर मंडळात देखील लाल कांद्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. लाल कांद्याचे रोपे वाया गेल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी गावरान कांद्याचे रोप टाकण्यास सुरुवात केली आहे. नव्याने लागवड केलेल्या लाल कांद्यास, तसेच गावरान कांद्याच्या रोपांसाठी पोषक वातावरण आहे. तसेच, तालुक्यात झालेल्या सर्वदूर पावसाने मुबलक पाणी उपलब्ध झाले असून, गहू, ज्वारी व गावरान कांद्याच्या पिकात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

लागवड केलेल्या कांद्याला तसेच कांद्याच्या रोपांना वेळोवेळी बुरशीनाशक औषध फवारणी करावी. पाणी देताना वापसा पाहून पाणी द्यावे. शेतीमध्ये पिकांची फेरपालट करावी. पिकांवर रोग दिसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
                                       – संदीप काळे, कृषी सल्लागार, साईनाथ कृषी उद्योग

लाल कांद्याचे 5 एकर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन होते. परंतु, रोप वाया गेल्याने दोन एकरवरच लागवड करावी लागेल. विकतचे रोप घेणे परवडत नाही. पाणी मुबलक असल्याने गावरान कांदा, गव्हाचा पेरा वाढेल.
                                                           – सूरज तोडमल,शेतकरी, जेऊर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news