

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आरबीआयने सेवा विकास बँकेचा परवाना नुकताच रद्द केला. याला बँकेचे माजी अध्यक्ष अॅड. अमर मूलचंदानी आणि त्यांचे सहकारी संचालक जबाबदार असून त्यांच्यावर सरकारने मोक्कांतर्गत कारवाई करावी. तसेच, केंद्र सरकारच्या ईडी व आयटी विभागाने बँकेतील आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करावी, अशी मागणी माजी उपमहापौर डब्बू आसवानी आणि उद्योजक श्रीचंद आसवानी यांनी केली आहे. पिंपरी येथे बुधवारी (दि.12) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली.
पत्रकारांशी संवाद साधताना डब्बू आसवानी म्हणाले की, ड. अमर मूलचंदानी सन 2009 पासून या बँकेचे अध्यक्ष आहेत.
बँकेच्या संचालक मंडळाने मागील काळात केलेल्या बेकायदेशीर कर्जवाटप आणि अनियमित व्यवहारांबाबत आम्ही वेळोवेळी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. पालकमंत्री, सहकार आयुक्त तसेच संबंधित शासकीय संस्थांना निवेदन देऊन दखल घेणेविषयी विनंती केली होती. तसेच, वेळोवेळी बँकेतील चुकीचे गैरव्यवहार उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले होते. सहनिबंधक लेखापरीक्षण राजेश जाधवर यांनी सन 2019 मध्ये बँकेचा चाचणी लेखा परीक्षण अहवाल सादर केला. यामध्ये अनेक कर्ज खात्यांबाबत आक्षेप घेण्यात आला. तब्बल 429 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे कर्ज संशयितरित्या वाटप झाल्याचे समोर आले.
त्यामुळे बँकेवर मागील वर्षी निर्बंध घालून प्रशासक नेमण्यात आले. मात्र, तरीदेखील कर्ज वसुलीत वाढ न झाल्याने आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केला आहे. उद्योजक श्रीचंद आसवानी म्हणाले की, दुचाकी घेण्याची आर्थिक क्षमता नसणार्यांच्या नावे अमर मूलचंदाणी यांनी कोट्यवधी रुपयांची वाहने खरेदी केली. बँकेतील रक्कम शहरातील काही व्यापारी व उद्योजकांना बेकायदेशीररित्या तीन टक्के मासिक व्याजाने वितरित केली. मूलचंदानी यांच्याकडे कोट्यावधी रुपयांच्या आलिशान मोटारी कोठून आल्या. याविषयीची चौकशी केंद्र सरकारच्या ईडी व आयटी विभागाने चौकशी करावी. तसेच, मूलचंदाणी आणि त्यांचे सहकारी संचालक मंडळ मालमत्ता जप्त करावी.
…तर पिंपरी सोडेन
उद्योजक श्रीचंद आसवानी आणि डब्बू आसवानी यांनी ठेवीदारांना ठेवी काढून घेण्यास सांगितले. त्यामुळे बँक अडचणीत आल्याचा आरोप बँकेचे माजी अध्यक्ष ड. अमर मूलचंदानी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर प्रसारित केला. मात्र, श्रीचंद आसवानी यांनी मूलचंदानी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, ते म्हणाले की, मी बँकेतून ठेवी काढून घेण्याबाबत कोणालाही सांगितले नाही, जर अशी पाच लोक मला दाखवून दिल्यास मी पिंपरी सोडून दुसर्या शहरात निघून जाईल.