

नगर : पुढारी वृत्तसेवा : भिंगारमधील बनावट एनओसी प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या रोहन किशोर धेंडवाल (रा. वैद्य, कॉलनी, नगर-जामखेड रोड) याच्या तीन बँक खात्यांत 11 महिन्यांच्या कालावधीत 63 लाख रूपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. धेंडवालची दोन बँक खाती तपासली असून, आणखी एका बँक खात्याची तपासणी सुरू आहे. बनावट एनओसी प्रकरणात पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या पथकाने मंगळवारी विनय दत्तात्रय वराडे (वय 63, रा. भिंगार) या तिसर्या आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या तीन झाली आहे. हा आरोपी लष्करातीलच एनओसी विभागातील सेवानिवृत्त असल्याने आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
यापूर्वी कोतवाली पोलिसांनी एका वरिष्ठ लष्करी अधिकार्याच्या महिला स्वीय सहायकाचा पती राजेंद्र देशराजसिंग ठाकूर उर्फ राजा ठाकूर (वय 42, रा. वैद्य कॉलनी) याला अटक केली होती. त्यानंतर, रोहन किशोर धेंडवाल (रा. वैद्य कॉलनी, नगर-जामखेड रोड) याला अटक केली होती. पोलिस कोठडीत असलेल्या रोहन धेंडवाल याची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, धेंडवालच्या दोन बँक खात्यात 11 महिन्यांत 63 लाखांची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यात 58 लाख रूपये तर नाशिक मर्चंट्स या बँकेच्या खात्यात 5 लाखांची देवाणघेवाण झाली आहे.
तसेच, मंगळवारी अटक केलेल्या विनय वराडे याला 15 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली असून, रोहन धेंडवालच्या कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे. तर, आरोपी राजा ठाकूर हा न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गजेंद्र इंगळे यांचे पथक करत आहे.
धेंडवालच्या लॅपटॉपचा शोध सुरू
आरोपी रोहन धेंडवाल याच्या लॅपटॉपचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. दरम्यान, लॅपटॉप धेंडवालची आई घेऊन पसार झाल्याची माहिती असून पोलिस तिच्या मागावर आहेत. लॅपटॉपमध्ये तपासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.