बोटा : पुणे-नाशिक मार्गावरील गटारीचे स्लॅब कोसळले | पुढारी

बोटा : पुणे-नाशिक मार्गावरील गटारीचे स्लॅब कोसळले

बोटा : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सर्व्हिस रोडची कामे अपूर्ण, रोडच्या गटारावरील स्लॅब कोसळले असून गटारावर मोठे खड्डे निर्माण झाले आहे. यात छोट-े मोठे अपघात होण्याची शक्यता असून या महामार्गावरील प्रवास आता प्रवाशांसाठी सुखकर नसून खडतर प्रवास होत आहे.
पठार भागातील आंबी खालसा फाट्यावर या आधी अनेक छोटे मोठे अपघात झाले आहे. इथे अनेक प्रवाशांनी आपले जीव गमावले आहेत. अनेक वाहनांचे लाखो रुपयांचे नुसकान झाले आहे. हा फाटा अपघाताचा केंद्रबिंदू मनाला जाऊ लागला आहे.

या ठिकाणी उड्डाण पूल बांधण्यात यावा, ही मागणी येथील नागरिक अनेक दिवसांपासून करीत आहे.परंतु त्यावर आद्याप पर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यात या फाट्यावर गटारावरील स्लॅब कोसळून मोठा खड्डा पडला असून या खड्ड्यात रात्रीच्या अंधारात अनेक चार चाकी गाड्या अडकतात. तर मोटर सायकलस्वार धरपडून पडत असल्याच्या घटना घडत आहे. महामार्ग प्रशासन फक्त टोल वसुली करण्यात मग्न असून दुरुस्तीची कामे आता कोण करणार? असा संतप्त सवाल आता प्रवाशांबरोबर नागरिक देखील देखील करू लागले आहेत.

अतिवृष्टी मध्ये पठार भागातील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे अनेक गावांचे रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहे. रस्त्यांची दैना झाली आहे. या रस्त्यांची, पुलांची, महामार्गावरील गटार, सर्व्हिस रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करावी म्हणून बोटा येथे रास्ता रोको करून सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. तरी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्रशासनाने अपूर्ण कामे पूर्ण करावी. रस्त्यांची, पुलांची दुरुस्ती करावी हीच मागणी जोर धरू लागली आहे.

अजून किती जणांचा बळी जाणार!
नाशिक-पुणे या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने नाशिक ते पुणे हे अंतर कमी झाले. सदरचा रस्ता नवीन होता यावेळी अतिशय वेगामुळे अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांनी आपली जीव गमवावा लागला. नुकत्याच झालेल्या पावसाने या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठाले खड्डे निर्माण झालेले आहेत. रात्रीच्यावेळी चालकांना हे खड्डे दिसत नसल्याने रोजच छोटे-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे हा रस्ता आणखी किती जणांचा बळी घेणार असा सवाल? पठार भागातील नागरिक करीत आहेत.

Back to top button