आमदार राम शिंदे यांचा खर्ड्यात निषेध; बारामती अ‍ॅग्रोच्या गाळपविरोधातील भूमिकेवर राष्ट्रवादी, ‘स्वाभिमानी’ची टीका | पुढारी

आमदार राम शिंदे यांचा खर्ड्यात निषेध; बारामती अ‍ॅग्रोच्या गाळपविरोधातील भूमिकेवर राष्ट्रवादी, ‘स्वाभिमानी’ची टीका

जामखेड, पुढारी वृतसेवा: आ. राम शिंदे यांनी बारामती अ‍ॅग्रोच्या साखर कारखान्याने सुरू केलेल्या गाळपविरोधातील भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जामखेड तालुक्यातील खर्डा बसस्थानकासमोर निषेध करण्यात आला.
आमदार शिंदे आकस व सुडाचे राजकारण करत आहेत. आ. रोहित पवार यांच्या कारखान्याविरोधात आकस व सूडबुद्धीने कारवाई करण्याच्या व्यर्थ मागण्या करण्याऐवजी राज्य व केंद्रातील सत्तेचा वापर विधायक विकासकामे करण्यासाठी करावा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह गोलेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी आ.राम शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आ. शिंदे यांनी पुणे येथे साखर आयुक्तांची भेट घेत बारामती अ‍ॅग्रोच्या साखर कारखान्याने 15 ऑक्टोबर रोजी गाळप सुरू करण्याऐवजी 10 ऑक्टोबर रोजी सुरू केल्याचे कारण देत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. बारामती अ‍ॅग्रो सारख्या कारखान्याच्या चोख नियोजनामुळे मतदारसंघातील शेतकर्‍यांना ऊसाचे पैसे वेळेवर मिळतात. इतर कारखान्यांपेक्षा भावही चांगला मिळतो. त्यामुळे येथील शेतकरी याच कारखान्याला ऊस घालण्याबाबत आग्रही असतात. त्यामुळे कारखाने जास्त काळ चालवणे गरजेचे आहे.

बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने या हंगामापासून गाळपाची क्षमता 2 हजार मेट्रिक टनाने वाढवली असल्याने जास्तीतजास्त शेतकर्‍यांचा ऊस येथे गाळप करता येईल, अशी परिस्थिती असताना आमदार शिंदे यांच्या भूमिकेमुळे शेतकर्‍यांच्या आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल लोंढे यांनी केला आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह गोलेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल लोंढे, सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, सोसायटीचे उपाध्यक्ष शिवाजी भोसले, भीमराव लेंडे, प्रशांत वारे यांनी भाषणे केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे, सोसायटीचे चेअरमन मुकुंद गोलेकर, संचालक संजय सुर्वे, तात्या ढेरे, राजू जिकरे, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे आदी उपस्थित होते.

Back to top button