इंदोरी फाट्यावर अवैध दारूची विक्री ; कारवाई मात्र शून्यच | पुढारी

इंदोरी फाट्यावर अवैध दारूची विक्री ; कारवाई मात्र शून्यच

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्याच्या प्रवरा, मुळा, आढळा व आदिवासी भाग या चारही विभागात अवैध दारू विक्री सर्रास फोफावली आहे. अवैध दारू विक्रीचे केंद्र इंदोरी फाटा बनले आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांच्या मेहेरबानीमुळे अवैध दारू उत्पादकांचे चांगलेच फावत आहे. अधिकार्‍यांशी ‘अर्थ’पूर्ण संबंधांमुळे काहीच कारवाई होत नसल्याने अवैध दारू विक्रेते सुसाट सुटल्याचे संतप्त चित्र आहे. डाव्या चळवळीचा व थोर क्रांतिकारकांचा अशी या तालुक्याची ओळख आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे.

अकोलेतील शाहूनगर परिसरात बनावट दारूमुळे काहीजण प्राणास मुकले. यानंतर 15 ऑगस्ट रोजी दारूबंदी चळवळीचे प्रणेते हेरंब कुलकर्णी यांनी धरणे आंदोलन केले. राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधिक्षक गणेश पाटील यांनी अवैध दारू धंदे बंद करण्याचे आश्वासन आदोलकांना दिले. यानंतर काहीकाळ दारू बंद केली, मात्र पुन्हा राजरोसपणे दारू विक्री सुरू आहे. राज्य उत्पादनचे अधिकारी व पोलिस नागरिकांचा रोष शांत होईपर्यंत कारवाई करतात.

प्रकरण थंड झाले की, कारवाई थंड होते. सिन्नर, संगमनेरातून इंदोरी फाटा येथे खुस्कीच्या मार्गाने देशी दारू आणून ती एजंटांमार्फत गावोगावी पोहोचते. इंदोरीतून अकोले, राजूर, देवगाव, खडकी, गणोरे, विरगाव फाटा, कोतुळ, निळवंडे, निब्रळ, बाम्हणवाडा, समशेरपूर आदी परिसरात अवैध दारु पुरविण्यात येते.

 

इंदोरी फाटा हेच अवैध दारू वाटपाचे केंद्र आहे. हे गेल्या आंदोलनापासून सांगतो. येथील हॉटेल कायमस्वरूपी बंद व्हावे, अशी मागणी करणार आहोत. परंतु, संबंधित विभागाने अवैध दारू हद्दपार करावी.
                                                             – हेरंब कुलकर्णी, दारूबंदी चळवळ प्रणेते

Back to top button