नगर : रब्बीसाठी 42 हजार मे.टन. खतसाठा मंजूर, जिल्ह्यात पेरणी क्षेत्र वाढणार | पुढारी

नगर : रब्बीसाठी 42 हजार मे.टन. खतसाठा मंजूर, जिल्ह्यात पेरणी क्षेत्र वाढणार

नगर : पुढारी वृत्तसेवा : मुबलक पाऊस आणि त्यामुळे शाश्वत पाण्याची उपलब्धतेमुळे यावर्षी रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. या दृष्टीने कृषी विभागाने खते आणि बियाणांचे नियोजन करून ठेवले आहे. दरम्यान, खरीप हंगामातील 83 हजार मे.टन. खत जिल्ह्यात शिल्लक आहे. त्यात आणखी नव्याने 2 लाख 55 हजार मे.टन. खताची मागणी करण्यात आली असून, यापैकी पहिल्या टप्प्यातच 42 हजार मे.टन.खतपुरवठ्याला कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाली आहे. तर, रब्बीसाठी 45 हजार क्विंटल बियाणाची मागणीही करण्यात आली आहे.

खरीप हंगामावर शेवटच्या टप्प्यात अवकाळीने पाणी फिरल्यानंतर सोयाबीन, कापूस उत्पादकाचे तोंडचे पाणी पळाले. आता 1 ऑक्टोबरपासून रब्बी हंगाम सुरू झाला आहे. कपाशी, सोयाबीन काढल्यानंतर 15 नोव्हेंबरपासून खर्‍या अर्थाने रब्बी पेरण्यांना वेग येईल. त्यात गहू, हरभरा या पिकांचा प्रामुख्याने समावेश असेल. सोयाबीन, कपाशी, ऊस खोडव्याची राने मोकळी झाल्यानंतर त्या ठिकाणी रब्बी पेरण्या केल्या जातील. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे त्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांच्या मार्गदर्शनात खते, बियाणांच्या मागणी आणि पुरवठा या संदर्भात कृषी आयुक्तालयाकडे पाठपुरावा केला जात आहे.

36 हजार मे.टन. युरिया उपलब्ध
युरिया 28 हजार मे.टन शिल्लक आहे. आता रब्बीसाठी पुन्हा 98243 मे.टन. मागणी करण्यात आली आहे. यापैकी 11 हजार मे.टन मंजूर करण्यात आले असून, यापैकी 8460 मे.टन. युरिया आजमितीला उपलब्धही करून देण्यात आली आहे. त्यामुळे खरिपाची शिल्लक आणि आता मिळालेली, अशी एकूण 36561 मे.टन युरिया उपलब्ध आहे. यापैकी 7312 मे.टन. युरियाची विक्री झाली आहे.

एमओपी, डीएपी मुबलक!
एमओपी मागील शिल्लक 1117, नवीन मागणी 9791, एस.एस.पी शिल्लक 16717, मागणी 25969, डीएपी शिल्लक 3875, मागणी 17136, संयुक्त खते शिल्लक 33403, मागणी 1 लाख मे.टन. असे नियोजन आहे. त्यामुळे शिल्लक आणि मागणी लक्षात घेता यावर्षी खतांचा तुटवडा जाणार नसल्याचेच कृषी विभागाकडून सांगितले जाते. रब्बीसाठी बियाणे बाजारात यावर्षी रब्बी हंगामाचे साधारणतः 3 लाख हेक्टर क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. यात ज्वारीचे प्रमाण कमी होऊन गहू, हरभरा, करडई, सूर्यफूल इत्यादी क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशाप्रकारे रब्बी हंगामासाठी 4 लाख 74 हजार 590 हेक्टर क्षेत्र संभाव्य लक्षात घेऊन त्या दृष्टीने बियाणांचे नियोजन केले जात आहे. यातील गहू, हरभरा आणि ज्वारीचे बियाणे कृषी केंद्रांमध्ये शेतकर्‍यांसाठी उपलब्ध झालेले आहे.

महाबीजकडे बियाणे मागणी
रब्बी हंगामासाठी संभाव्य क्षेत्र लक्षात घेता 45 हजार क्विंटल बियाण्याची गरज पडणार आहे. 33 हजार 720 क्विंटल बियाणाची महाबीजकडे मागणी करण्यात आलेली आहे. सध्या 6458 क्विंटल बियाणे उपलब्ध असून, यापैकी 2057 क्विंटल बियाणाची विक्री झाल्याचे समजते.  गहू 27 हजार क्विंटल बियाणे रब्बी हंगामासाठी शिल्लक 6458 क्विंटल बियाणे आहे. मात्र, आणखी ज्वारी 4200 क्विंटल, गहू 27 हजार 375, हरभरा 13 हजार 650 क्विंटल बियाणाची गरज पडणार आहे. या दृष्टीने जिल्हा परिषदेकडून कृषी आयुक्तांकडे तशी मागणी करण्यात आलेली आहे. यापैकी उपलब्ध असलेल्या 1908 पैकी ज्वारीचे 1237 क्विंटल बियाणे विक्री झाली आहे.

शेतकर्‍यांमधून बियाणांना मागणी नाही
ऑक्टोबरचा पहिला आठवडा उलटला तरीही अजूनही किमान जिरायती भागातही रब्बी पेरण्यांची लगबग सुरू झालेली दिसत नाही. वापसाची अडचण असल्याने शेतकर्‍यांनी पेरण्यांचे धाडस दाखविलेले नाही, परिणामी, बियाणे उपलब्ध असूनही अद्याप अपेक्षित मागणी नसल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे.

Back to top button