कर्जत : पुलाअभावी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित, नदी पार करण्यासाठीचे जुगाड तहसीलदारांनी केले जप्त; पूल उभारणीची मागणी

कर्जत : पुलाअभावी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित, नदी पार करण्यासाठीचे जुगाड तहसीलदारांनी केले जप्त; पूल उभारणीची मागणी

कर्जत, पुढारी वृत्तसेवा: आष्टी तालुक्यामधून कर्जत तालुक्यात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी सीना नदीवर पूल नसल्यामुळे किंवा येण्या-जाण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहात आहेत.

आष्टी तालुक्यातील हिंगणी गावामधील चौधरी व पावशे वस्ती येथील विद्यार्थी शिक्षणासाठी कर्जत तालुक्यातील नागलवाडीत येतात. सध्या सीना नदीला पूर आला आहे. नदीवर पूल नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. चौधरी व पावशे वस्ती हे दोन्ही गावे सीना नदीच्या काठावर आहेत. ही गावे आष्टी तालुक्यामधील असली, तरी त्यांचे दैनंदिन व्यवहार व शिक्षण कर्जत तालुक्यातील नागलवाडी व मिरजगाव परिसरात होते.

आष्टी व कर्जत तालुक्यातील हद्दीमधून वाहणारी सीना नदी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू माफियांकडून अवैध वाळू उपसा सुरू आहे. नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात झाल्यास धोका होऊ शकतो. चौधरी व पावशे वस्ती येथील ग्रामस्थांनी कर्जतच्या तहसीलदारांकडे तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी सीना नदीमधून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जुगाड तयार करण्यात आले आहे आणि त्यामधून जाताना धोका होऊ शकतो, असे म्हटले. त्यावर कर्जत व आष्टीच्या तहसीलदारांनी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने जुगाड तयार करून घेऊन जाणे धोकादायक आहे, असे कारण दाखवून हे जुगाड जप्त केले. विशेष म्हणजे, हे जुगाड जप्त करताना त्या ठिकाणी वाळू माफिया उपस्थित होते. या वाळू माफियांचे वाळू उपसा करण्यासाठी लागणारे इंजिन व इतर साहित्य मात्र तसेच ठेवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

धोका टाळण्यासाठी जुगाड जप्त

कर्जत व आष्टीच्या तहसीलदारांनी विद्यार्थ्यांना धोका होऊ नये, म्हणून तत्काळ जुगाड जप्त केले. तसेच, नागलवाडीतील शिक्षकांना आष्टी तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळेत येऊ देऊ नका, अशा सूचना केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मानवनिर्मित व नैसर्गिक संकटांमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींंनी पुढाकार घेऊन तातडीने पूल उभारण्याची मागणी पालक व ग्रामस्थांमधून होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news