कोपरगाव : पावसाने ऊस गाळपाचे नियोजन बिघडणार | पुढारी

कोपरगाव : पावसाने ऊस गाळपाचे नियोजन बिघडणार

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा: राज्यात गेल्या दोन वर्षांपासून वरूणराजा चांगलाच बरसत असल्याने बहुतांश शेतकरी ऊस पिकाकडे वळाले, मात्र मागील हंगामात शेतकर्‍यांना साखर कारखान्यांचे उंबरठे झिजवावे लागले, मिन्नतवारी करावी लागली. जानेवारीत तुटणारा ऊस थेट मे महिन्यात गाळपास गेला, तरीही चालु वर्षी मागील वर्षापेक्षा अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर जादा ऊस लागवड झाली. त्यात लांबलेला पाऊस यंदाही ऊस गाळपाचे नियोजन बिघडवणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या मनामध्ये आत्तापासूनच धाकधुक वाढली आहे.

साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा यंदा ऑनलाईन ऐवजी थेट सभासद सहभागाने होत आहेत. त्यात बहुतांष कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविण्याचा विषय पत्रिकेवर घेतला. पर्जन्यमान चांगले असल्याने पाच वर्षे साखर कारखान्यांचा काळ उज्वल असणार आहे. सन 2021.22 या हंगामात राज्यात 12 लाख 32 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली होती. यातुन 13 कोटी 16 लाख मे. टन उस गाळपासाठी आला. 2 हजार 500 रूपये एफआरपीप्रमाणे शेतकर्‍यांच्या खात्यात 329 कोटी 75 लाख रूपये मिळाले. इथेनॉल उत्पादनासाठी 10 लाख टन ऊस गेला. शिवाय गाळप हंगाम 8 महिने चालला. 30 जुनपर्यंत उसाचे गाळप सुरूच होते.

अहमदनगर जिल्ह्यात 2 जुन रोजी सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपाअभावी तसाच उभा होता.
यंदा 2022.23 हंगामात 14 लाख 87 हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली. अंदाजे 14 कोटी 20 लाख मे. टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. त्यातुन 2 हजार 700 रूपये एफआरपीप्रमाणे शेतकर्‍यांच्या खात्यात 383 कोटी 48 लाख रूपये मिळण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी राज्यात 112 लाख मे टन साखर तयार झाली होती.

या हंगामात राज्यात 138 लाख टन साखर तयार होण्याचा अंदाज आहे. गेल्या पंधरा वर्षात देशात साखर उत्पादनात घट झाली आहे. 2016.17 हंगामापासुन साखर उत्पादनात वाढ होताना दिसत आहे. मागील हंगामात देशात उच्चांकी 360 लाख टन साखरेचे जागतिक उत्पादन झाले होते. त्यातील 37 लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळविण्यात आली. 81 लाख टन साखर निर्यात झाली. सन 2022. 23 च्या हंगामात 100 लाख टन साखर निर्यात होण्याचा संभव आहे. साखर उत्पादन व निर्यातीतून कारखान्यांना जादा रक्कम मिळत नाही.

100 लाख टन साखर निर्यात केली तर त्यापासुन 15 हजार कोटी रूपये मिळतात. त्याच साखरेचे 60 लाख टन इथेनॉल उत्पादन केले तर त्याला 63,400 रूपये प्रतिटन दर मिळतो. म्हणजेच 38 हजार 40 कोटी रूपये मिळतात. याचाच अर्थ साखर निर्यात केली तर 23 हजार 40 कोटी रूपयांचे देशाचे नुकसान होते. त्यापेक्षा त्यांनी इथेनॉल उत्पादन वाढविल्यास त्यातुन जास्त रक्कम मिळुन शेतकर्‍यांना किमान एफआरपीची रक्कम देताना सुकरता निर्माण होणार आहे.

Back to top button