राहुरी : टाकळीमिया पाणीयोजना वादाच्या भोवर्‍यात; ठेकेदाराकडून अनेक त्रूटी | पुढारी

राहुरी : टाकळीमिया पाणीयोजना वादाच्या भोवर्‍यात; ठेकेदाराकडून अनेक त्रूटी

राहुरी; पुढारी वृत्तसेवा: मूळ आराखाड्याला बगल देऊन ग्रामस्थांना गैरसोयीची ठरलेल्या राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील जलस्वराज्य टप्पा 2 अंतर्गत अर्धवट असलेली पाणीपुरवठा योजना वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या योजनेसंबंधित ठेकेदाराने प्रशासनाला हाताशी धरून मनमानी काम करताना योजनेत अनेक त्रृटी ठेवल्यामुळे टाकळीमिया येथील बाळासाहेब जाधव यांनी ग्रामस्थांसह उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान, या इशार्‍याने खडबडून जागे झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाने टाकळीमिया येथे धाव घेतली. जाधव यांच्यासह ग्रामस्थांबरोबर चर्चा केली.

मात्र, संतप्त ग्रामस्थ व महिलांनी सदोष योजनेच्या त्रृटींवर बोट ठेवून अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे खजील झालेल्या अधिकार्‍यांनी आंदोलनकर्ते जाधव व ग्रामस्थांच्या काही मागण्या मान्य केल्या. उर्वरित मागण्यांसाठी प्रशासनाने पंधरा दिवसांचा अवधी मागितला आहे. पंधरा दिवसांत योजनेतील त्रृटी दूर न झाल्यास उच्च न्यायालयात जाऊन संबंधीत ठेकेदार व प्रशासनाविरोधात याचिक दाखल करणार असल्याची माहिती बाळासाहेब जाधव यांनी दिली.

दरम्यान, या कामात कोणी दोषी आढळले, तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल. शेवटच्या घरापर्यंत शुद्ध पाणी देणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मुळे यांनी दिली. टाकळीमिया येथील या योजनेला ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित होऊन दोन वर्षे झाली. मात्र, सदोष योजनेमुळे गेल्या दोन वर्षांत ग्रामस्थांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे 9 कोटी रुपयांची ही महत्वाकांक्षी योजना ग्रामस्थांच्यादृष्टीने कुचकामी ठरल्याने ठेकेदार व म. जि. प्रा. च्या अधिकार्‍यांच्या आडमुठेपणामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले.

यावर टाकळीमिया येथील बाळासाहेब जाधव यांचा गेल्या दीड वर्षापासून शासकीय स्तरावर निवेदनाद्वारे पाठपुरावा सुरू आहे, मात्र, केवळ कागदी घोडे नाचवून ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीच्या तक्रारीला वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचे काम ठेकेदारासह प्रशासन करीत असल्याने टाकळीमिया ग्रामस्थांसह महिलांचा संताप वाढला आहे.

सध्या ही योजना अर्धवट अवस्थेत आहे. योजनेतून दुर्गंधीयुक्त पाण्याचा पिण्यासाठी अपूर्ण क्षमतेने पुरवठा होत आहे. त्यामुळे योजना असूनही महिलांना हंडाभर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसताच अधिकारी खडबडून जागे झाले. त्यांनी टाकळीमिया येथे येऊन संपूर्ण योजनेची पाहणी केली.

पाणीयोजना टाकळीमिया ग्रामस्थांच्या दृष्टीने मोठी महत्वाकांक्षी आहे. या योजनेतून शेवटच्या घटकापर्यंत शुद्ध पाणी जात नाही. तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. ग्रामस्थांचे समाधान होईल, अशी कामे जर संबंधित ठेकेदार व प्रशासनाने न केल्यास त्यांच्याविरूद्ध फौजदारी स्वरुपाची कारवाईसाठी जन आंदोलन उभारणार आहे. वेळप्रसंगी उच्च न्यायालयात संबंधितांविरूद्ध याचिका दाखल करणार आहे. आता स्वस्थ बसणार नाही. या योजनेसाठी टाकळीमिया ग्रामस्थांचा मोठा लोकसहभाग व मोठे योगदान असल्याने त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
                                                                 – बाळासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते

Back to top button