अकोले : वृक्षतोडीत शेकडो पानकावळे मृत्यूमुखी | पुढारी

अकोले : वृक्षतोडीत शेकडो पानकावळे मृत्यूमुखी

अकोले : पुढारी वृत्तसेवा : शहरातील नवलेवाडी फाट्यानजीक शनिवारी सायंकाळी अकोले नगरपंचायत अंतर्गत येणार्‍या परिसरात आंबा, इलाई चिंच, पिंपळाच्या झाडाची कत्तल करण्यात आली. या कत्तलीत सुमारे शेकडो नवजात पानकावळ्यांच्या पिल्लांचा करुण अंत झाला आहे. अक्षरशः अंगावर शहारे अन डोळ्यांत पाणी आणणारी ही घटना घडली आहे. नवलेवाडी फाट्यानजीक उंचखडककडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला पिंपळ, चिंच, आंबा या झाडांच्या काही फांद्या वीजवाहक तारांना स्पर्श करीत होत्या. त्यामुळे हे झाड तोडण्यात आल्याचे काही स्थानिक नागरिक सांगतात. मात्र, या झाडांवर असलेल्या कोवळ्या पिल्लांचा या वृक्षतोडीत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

झाड तोडल्यानंतर रस्त्यावर या पिल्लांच्या रक्ताचा अक्षरशः सडा पडला होता. परंतु संबंधिताने केलेल्या वृक्षतोडीमुळे शेकडो पिल्लं मृत झाल्याचे कळताच संबंधित झाड तोडणार्‍याने मयत पिल्ले ही गोणीत भरून गायब केली. या घटनेची वनविभागाला माहिती कळताच वनविभागाने घटनास्थळी जाऊन काही मयत पिल्ले अन जखमी पिल्ले ताब्यात घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.
वनविभागाला घटनास्थळी काही मयत पिल्ले सापडले, तर 22 जिवंत पिल्ले आढळली आहेत.

दरम्यान या घटनेची वनविभागाने गंभीर दखल घेतली असून नगरपंचायत हद्दीत वृक्षतोड घटना झाली आहे. त्यामुळे वृक्षतोडीची परवानगी अकोले नगरपंचायतीकडून घेणे गरजेचे आहे.

कमिशन घेणे हाच आमचा धंदा
महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 आणि वन्यजीव अधिनियम 1972 नुसार दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी सांगितले. अकोले नगरपंचायतीने वृक्षतोडीसाठी संबंधित ठेकेदाराला वृक्ष प्राधिकरणाची परवानगी दिली होती का? संबंधितांनी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. या निरागस गोड मुक्या पिल्लांच्या मृत्यूने मन हेलावून गेले आहे.

Back to top button