विद्यार्थिनीची छेडछाड करणार्‍या तिघांना चोप, देवळाली प्रवरा येथील घटना | पुढारी

विद्यार्थिनीची छेडछाड करणार्‍या तिघांना चोप, देवळाली प्रवरा येथील घटना

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलीची छेडछाड करून विनयभंग केल्याची घटना आज सकाळी देवळाली प्रवरा शहरात घडली. दरम्यान, यावेळी स्थानिक नागरिकांनी छेडछाड करणार्‍या तिघांना चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पीडित अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात श्रीरामपूर तालुक्यातील तिघांसह अन्य एका अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळाली प्रवरा परिसरात 16 वर्षीय अल्पवयीन युवतीची इच्छा नसताना तिचा वेळोवेळी पाटलाग करून, ‘मला तू खूप आवडते. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तू मला होकार दे, नाहीतर मी आत्महत्या करील, अशी धमकी दिली. दरम्यान, आज (शनिवारी) सकाळी 10 वाजेच्या सुमारास अल्पवयीन युवती देवळाली प्रवरा गावातील निल कमल बेकरी येथे पेस्ट्री घेण्याकरीता थांबली असता (महांकाळ वडगाव, ता. श्रीरामपूर) येथील तिघे व अन्य एक अनोळखी व्यक्ती तिच्याजवळ आले. एकाने तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तो म्हणाला, ‘तू जर आज मला होकार दिला नाही तर मी तुला उचलुन घेवुन जाईल.’

यावेळी आणखी एक अनोळखी युवक तिला म्हणाला, ‘तू त्याला होकार दे, तो आमचा मित्र आहे. होकार नाही दिला तर आम्ही तुला मारून टाकू’, अशी धमकी दिली. याप्रकाराने घाबरलेल्या युवतीने आरडा ओरडा केल्याने स्थानिक नागरिक जमा झाले. त्यांनी या तिघांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, आणखी एक अनोळखी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. यापैकी दोघे युवक अल्पवयीन आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सज्जनकुमार नार्हेडा करीत आहेत.

Back to top button