राहुरी : हवालदाराच्या कुटुंबियांना दहा लाखांची मागणी; बेलवंडीच्या पीआयची बदली | पुढारी

राहुरी : हवालदाराच्या कुटुंबियांना दहा लाखांची मागणी; बेलवंडीच्या पीआयची बदली

राहुरी/श्रीगोंदा: पुढारी वृत्तसेवा : बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केलेले भाऊसाहेब आघाव यांच्या कुटुंबियांना धमकीची दोन पत्रे आल्याने खळबळ उडाली. या पत्रातून आघाव कुुटुंबियांकडे दहा लाखाची मागणी केली आहे. त्याची दखल घेत संरक्षणासाठी तातडीने दोन बंदुकधारी पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत. सहाय्यक फौजदार सुनील मोरे यांच्या आत्महत्ये प्रकरणानंतर चर्चेत आलेले पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची नाशिकला बदली करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी किर्ती मोरे यांनी केली आहे.

आघाव कुटुंबियांना धमकी; पोलिस बंदोबस्त

मुळा धरण पोलीस चौकीत आत्महत्या करणारे हवालदार भाऊसाहेब आघाव यांना निनावी धमकीचे पत्र आले आहेत. या पत्राची दखल घेत त्यांच्या बारगाव नांदूर (राहुरी) निवासस्थानी दोन पोलिसांचा बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. ड्युटीवर असताना भाऊसााहेब आघाव यांनी 1 ऑक्टोबरला स्वतःच गोळी झाडून आत्महत्या केली होती. सुसाईट नोटमध्ये दहा लाखासाठी सहाय्यक फौजदाराने छळ केल्याचा उल्लेख केल्याने चार पोलीस कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.

शुक्रवारी आघाव कुटुंबियांना दोन निनावी पत्र आले.त्यात कुटुंबियांना संपविण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याची दखल घेत तात्काळ दोन बंदूकधारी पोलीस आघाव कुटुंबियांच्या संरक्षणार्थ तैनात करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करत दहा लाख रुपयांची मागणी केली. त्यातूनच आघाव यांनी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल आहे. निनावी पत्राद्वारे धमकी आल्याने प्रेमकुमार भाऊसाहेब आघाव यांनी राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांवर फिर्याद दिली आहे.

नगरच्या पत्त्यावर दहा लाख मागितले
दि. 7 ऑक्टोबर रोजी भाऊसाहेब आघाव यांच्या घरी पोस्टाने दोन निनावी पत्र आले. आलेले पाकिट फोडून वाचले असता त्यात मयत भाऊसाहेब आघाव यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर लिहिलेला आाहे. सुसेन महाराज नाईकवाडे अहमदनगर, नागापूर एमआयडीसी, जिमखाना हॉल येथे 10 लाख रुपये जमा करा. भाऊसाहेब यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात येईल. कुटूंबातील एकही शिल्लक राहणार नाही, असा धमकीचा मजकूर पत्रात असल्याचे प्रेमकुमार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल झालेले आरोपी पसार असून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

 

 

Back to top button