शिर्डी : दहीहंडीने साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची सांगता; दसरा महोत्सवास भाविकांची मांदियाळी | पुढारी

शिर्डी : दहीहंडीने साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची सांगता; दसरा महोत्सवास भाविकांची मांदियाळी

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने मंगळवार (दि. 4) पासून सुरु असलेल्या श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची सांगता काल काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली. उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे काकड आरती, त्यानंतर श्रींचे मंगल स्नान व ‘शिर्डी माझे पंढरपूर’ ही आरती झाली. सकाळी 7 वाजता संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व त्यांचे पती संजय धिवरे (सहआयुक्त प्राप्तिकर विभाग, नाशिक) यांच्या हस्ते गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली. समाधी मंदिरात प्र. प्रशासकीय अधिकारी संजय जोरी व त्यांच्या सुविद्य पत्नी किरण जोरी यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा करण्यात आली.

सकाळी 10 वाजता ह.भ.प. अंजली श्रीकृष्ण जोशी यांचे गोपाळ काल्याचे कीर्तन झाले. काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, प्राप्तीकर विभाग नाशिक सहआयुक्त संजय धिवरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी, कर्मचारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर दुपारी श्रींची मध्यान्ह आरती झाली.

सायंकाळी श्रींची धुपारती झाली. रात्री गायिका गोविंद सखाराम देशपांडे यांचा सुगम संगीत हा कार्यक्रम श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर झाला. या कार्यक्रमास श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली. रात्री 10 वाजता श्रींची शेजारती झाली.
हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी उपस्थित होते.

दोन लाख साईभक्तांनी घेतले दर्शन
उत्सवकाळात सुमारे 2 लाख साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर 1 लाख 95 हजार 242 लाडू प्रसाद पाकिटांचा साईभक्तांनी लाभ घेतला. याबरोबरच श्री साई प्रसादालयात सुमारे 1 लाख 60 हजार साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा व अल्पोपहार म्हणून 43 हजार 675 अन्न पाकिटांचा साईभक्तांनी लाभ घेतला.

150 पोते धान्य; 4 लाख 21 हजारांचे दान
श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेल्या भिक्षा झोळीत ग्रामस्थ व साईभक्तांनी भरभरुन दान दिले. यामध्ये गहू, तांदूळ व बाजरी असे सुमारे 150 पोते धान्यरुपाने आणि गूळ, साखर व गहू आटा आदींद्वारे 3 लाख 60 हजार 279 रुपये व रोख स्वरुपात रुपये 61 हजार 554 रुपये, अशी एकूण 4 लाख 21 हजार 833 रुपये इतकी देणगी भिक्षा झोळीद्वारे प्राप्त झाली.

Back to top button