सभापती पदासाठी आरक्षण निश्चित ; चार पंचायत समित्या ओबीसीसाठी आरक्षित | पुढारी

सभापती पदासाठी आरक्षण निश्चित ; चार पंचायत समित्या ओबीसीसाठी आरक्षित

नगर : पुढारी वृत्तसेवा : ग्रामविकास विभागाने नुकतेच जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण जाहीर केले. पंचायत समिती सभापतीपदासाठी आरक्षण कोटा निश्चित झाला असून, चार जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहेत. आरक्षण सोडत लवकरच काढली जाणार आहे. दिवाळीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची पूर्वतयारी सुरु आहे. जिल्ह्यात अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, नगर, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व जामखेड या चौदा पंचायत समित्या आहेत. या पंचायत समित्यांचे सभापतीपदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाने जिल्ह्यासाठीचा आरक्षण कोटा निश्चित केला. सदर कोटा राजपत्रात प्रसिध्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असल्यामुळे सात पंचायत समित्यांवर महिलाराज येणार आहे.अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 2 जागा आरक्षित असणार आहे. त्यामध्ये 1 जागा महिला प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 1 जागा असून, ती महिलासाठी राखीव आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 4 जागा निश्चित केल्या आहेत. त्यामधील 2 जागा महिलांसाठी असणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण सात जागा असून, त्यापैकी 3 जागा महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. सभापतींपदासाठी आरक्षण कोटा निश्चित करण्यात आला असून, काही महिन्यांत आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

Back to top button