नगर : शहरातील ओढ्या-नाल्यांवर आज फैसला? आयुक्तांनी बोलविली बैठक | पुढारी

नगर : शहरातील ओढ्या-नाल्यांवर आज फैसला? आयुक्तांनी बोलविली बैठक

नगर : पुढारी वृत्तसेवा : मुख्य शहरासह सावेडी, बोल्हेगाव, केडगाव उपनगरमध्ये 22 ठिकाणी नैसर्गिक ओढे-नाले बुजविल्यानेच पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचे सर्वेक्षणासमोर आले. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याने मनपा खडबडून जागी झाली असून, उद्या आयुक्तांच्या दलानात त्यावर आढावा बैठक होणार आहे. त्या बैठकीसाठी तक्रारदारांनी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अहमदनगर शहरात सुमारे सात ते आठ मोठे नैसर्गिक ओढे होते. आता प्रत्यक्षात त्या ओढ्याच्या नाल्या झाल्या आहेत. उपनगरामध्ये शहर वाढत चालल्याने अनेकांनी नैसर्गिक ओढे बुजवून अनधिकृत बांधकामे केली. तर, काही ठिकाणी ओढ्यावर पाईप टाकून बुजविण्यात आला. नैसर्गिक ओढ्याची रूंदी कमी केली. त्यामुळे पावसाळ्यात शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले, असे सर्व्हेक्षणात स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, दरवर्षी पावसाळ्यात शहरात पूर परिस्थिती निर्माण होते. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानंतर प्रशासन धाव-धाव करते. सावेडी उपनगरातील निर्मलनगर, गावडे मळा, नालेगाव, सर्जेपुरा, रामवाडी आदी भागांमध्ये ओढ्या-नाल्याचे पाणी घराध्ये शिरले होते. वर्षानुवर्षे नागरिकांना पूर परिस्थितीला समोरे जावे लागते. शहरातील पूर परिस्थितीचा विषय महापालिकेच्या महासभेत आणि स्थायी समितीच्या सभेत अनेक वेळा चर्चिला गेला. मात्र, त्यावर प्रत्यक्षात काहीच कार्यवाही होत नव्हती. महासभेत नगरसेवकांनी ओढ्या-नाल्यावरील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाच्या विषयावर प्रशासनाचे वाभाडे काढले. त्यानंतर प्रशासनाने ओढ्या-नाल्यांतील अतिक्रमणाचे सर्वेक्षण केले.

त्यात ओढ्यावर पाईप टाकून बुजविणे. ओढ्यामध्ये अतिक्रमित बांधकाम करणे अशा गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. हा प्रकार नेमका कोणत्या अधिकार्‍यांच्या कार्यकाळात झाला आणि त्यावर काय कारवाई होणार असा सवाल नगरसेवकांमधून उपस्थित केला जात आहे. यासंबंधी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी उद्या बैठक बोलविली असून, त्यात फैसला होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीला तक्रारदारांना बोलविण्यात आले आहे.

पाईप टाकून बुजविलेले ओढे
सूर्यानगर अभियंता कॉलनी, जुना पिंपळगाव रोड ते गावडे मळा, नरहरि नगर ते मंगल हौसिंग, कुष्ठधामजवळील ओढा, हॉटेल पंचशील समोरील नाला, विश्रामगृह ते कलेक्टर ऑफिसपर्यंतचा नाला, नवीन कलेक्टर ऑफिस ते मारुती मंदिरापर्यंत नाला, पंकज कॉलनी येथील नाला, राधाबाई काळे महाविद्यालयाजवळ नला, पत्रकार वसाहतीजवळील नाला, केडगाव-नेप्ती रोड ओढा, केडगाव नेप्ती रोड श्रीकृष्ण कॉलनी, आगरकर मळा खोकर नाला, पोलिस हेडकॉटरमधील नाला, वैष्णवी कॉलनी येथील नाला

तीस वर्षात ओढ्यावर अतिक्रमण करण्यास कोणी परवानगी दिली. ओढे बुजविण्याचे पाप नेमके कोणी केले. त्याच्यावर कारवाई अथवा गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे. नुसत्याच आढावा बैठका घेऊन काहीही उपयोग होणार नाही.
                                                                      – शशिकांत चेंगडे, तक्रादार

Back to top button