कर्जत : दमबाजी करून जागेवर अतिक्रमण ; पोलिसांत तक्रार | पुढारी

कर्जत : दमबाजी करून जागेवर अतिक्रमण ; पोलिसांत तक्रार

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील वालवड येथील शेतकर्‍याच्या खासगी जागेमध्ये महिलांना दमबाजी करून अतिक्रमण करण्याची घटना घडली. या घटनेने ते कुटुंब भयभीत झाले असून, शासनाने न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत वैशाली राऊत यांनी पत्रकारांना माहिती दिली की, त्यांच्या कुटुंबीयांची वालवड येथील गट नंबर 145मध्ये वडिलोपार्जित जागा आहे. मात्र, या जागेमध्ये स्थानिक काही विशिष्ट नागरिकांनी दडपशाही करून व जातीयवादाचे स्वरूप देत अतिक्रमण केले. यामुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले असून, लहान मुलांना नातेवाईकांकडे ठेवले आहे, तर रात्रीच्या वेळी महिलांना बाहेर पडण्यास भीती वाटते.

यावेळी त्यांच्यासमवेत पुष्पा राऊत, नंदा राऊत, लता राऊत, आशा राऊत, अमोल राऊत, हनुमंत राऊत, अशोक राऊत, विजय राऊत, विशाल राऊत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या संदर्भात राऊत कुटुंबीयांनी मिरजगाव पोलिस निरीक्षक, पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले की, तालुक्यातील वालवड येथे राऊत यांच्या मालकीच्या खासगी जागेत महिलेस दमदाटी करून व खोट्या गुन्ह्यात अडकू, असे धमकावून अतिक्रमण केले आहे. रस्त्याच्या विरुद्ध बाजूस असलेला स्तंभ काढून तो राऊत यांच्या खासगी जागेत लावण्यात आला आहे. राऊत म्हणाल्या, याघटने यासंदर्भात आम्हाला न्याय मिळावा अन्यथा पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आम्ही सर्वजण उपोषण करणार आहोत, असे वैशाली राऊत यांनी सांगितले.

Back to top button