संगमनेर : मुख्याध्यापकाकडून गतिमंद मुलीचा विनयभंग ; पोक्सोचा गुन्हा दाखल | पुढारी

संगमनेर : मुख्याध्यापकाकडून गतिमंद मुलीचा विनयभंग ; पोक्सोचा गुन्हा दाखल

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील एका मूकबधिर विद्यालयातील सात वर्षीय विद्यार्थीनीच्या ‘नाजूक’ भागावर चटके देऊन विनयभंग केल्याची काळीमा फासणारी घटना समोर आली. मुलीच्या मामाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापकासह दोघांविरोधात विनयभंग, बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे (पोक्सो) कलम 8, नुसार गुन्हा दाखल केला आहे. राहाता तालुक्यातील एका गावात राहत असणारी मुलगी संगमनेर येथील एका मूकबधिर विद्यालयात शिक्षण घेत होती. ती अन्य मुलींसोबत शाळेतील वसतिगृहातच राहत होती. मात्र ती अचानक रडत असल्यामुळे त्या विद्यालयाच्या शिक्षिकेने तिच्या आईला फोन करून ‘तुमची मुलगी एक सारखी रडत आहे. त्यामुळे तुम्ही शाळेत येवून तिला घेवून जा!’ असा निरोप दिला. त्यामुळे घाबरलेल्या त्या महिलेने ही माहिती तिच्या भावाला फोन करुन दिली अन् ती पतीसह संगमनेर येथे पोहोचली. माहिती देणार्‍या महिला शिक्षिकेची भेट घेत माहिती जाणून घेतली.

‘तुमच्या मुलीच्या नाजूक भागाच्या आसपास जखमा झालेल्या असून आम्ही तीन दिवसांपासून त्यावर उपचार करीत आहोत. मात्र त्यात कोणताही फरक पडत नाही त्यामुळे तुम्ही तिला घरी घेऊन जा आणि चांगल्या दवाखान्यात तिच्यावर उपचार करा’ असा सल्ला त्या शिक्षिकेने दिला. त्यानंतर आई वडिल त्या मुलीला घरी घेऊन गेले. एका खासगी डॉक्टरांना दाखवले आणि गोळ्या-औषधे घेतली. मात्र कुठलाच फरक न पडल्यामुळे त्या मुलीला लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेले. मुलीच्या तपासणीनंतर तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांकडे वैद्यकीय अहवाल मागितला असता तो तुम्हाला देता येणार नाही, तुम्ही पोलिस ठाण्यात जावून तक्रार दाखल करा, असे सांगितले.

आई-वडील आणि मामांनी प्रभारी मुख्याध्यापकाकडे जखमांबाबत विचारणा केली. स्वच्छतेच्या अभावामुळे त्वचेला संसर्ग होत असल्याचे सांगून चर्चेतून मार्ग काढण्याची विनंती मुख्याध्यापकाने केली. मात्र लोणीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी व्यक्त केलेला संशय आणि तपासणी अहवाल पोलिसांकडेच देण्याच्या भूमिकेमुळे त्या सर्वांच्या मनात शंका आली, अन् पोलिस ठाणे गाठले. संगमनेरचे पोलिस उपअधीक्षक राहुल मदने व पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची भेट घेवून संपूर्ण प्रकार कथन केला. त्यानुसार पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित मुलीला नगर येथे नेण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरु असून लोणीच्या ग्रामीण रुग्णालयाने दिलेल्या प्राथमिक तपासणी अहवालाच्या आधारावररुन गुन्हा नोंदविला.

चित्रा वाघ यांनी घेतली ‘एसपीं’ची भेट
सात वर्षांच्या मुलीच्या संदर्भात झालेल्या भयंकर प्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी गुरूवारी (दि.6) जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन केली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, ही मुलगी चार महिन्यांपासून मूकबधिर विद्यालयामध्ये राहत होती. सामाजिक कार्यकर्ता तसेच एका पत्रकाराने आई-वडिलावर दबाव आणण्याचा प्रकार केला. वास्तविक तिच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार झालेला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

Back to top button