राशीन पालखी सोहळा… अलोट जनसागराच्या साक्षीने दिमाखात पार पडला पडला | पुढारी

राशीन पालखी सोहळा... अलोट जनसागराच्या साक्षीने दिमाखात पार पडला पडला

किशोर कांबळे : 

राशीन : ‘उदो बोला, उदो..उदो,’ आई साहेबाचा उदो..उदो, बोल भवान की जय,’ असा गगनभेदी जयघोष सोबतीला ढोल-ताशे, नगारे आणि झांजांचा लयबद्ध आणि सातत्यपूर्ण गजर, रणसिंगाचा लक्षवेधी निनाद, तोफांची आसमंत दणाणून टाकणारी सलामी, चंगाळे-बंगाळ्याचा मर्दानी खेळ, आराधी व दिवट्यावाल्यांचे जथे, उत्साहाला आलेले उधान, अशा चैतन्यमय वातावरणात राशीनच्या जगदंबा देवीचा पालखी महोत्सव भाविकांच्या साक्षीने दिमाखात पार पडला. या सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. घटस्थापनेला सुरू झालेल्या यमाई मातेच्या यात्रेची कोजागिरी पौर्णिमेला सांगत होते. विजयादशमीनिमित्त उत्साहात सीमोल्लंघन झाले.

यानिमित्त देवीच्या पालखीची मिरवणूक करण्यात आली. मध्यरात्री 12 वाजता निघालेली मिरवणूक सायंकाळी आठ वाजता देवीच्या मंदिराजवळ विसर्जित झाली. कोरोनानंतर प्रथमच भाविक मोठ्या संख्येमध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. दसर्‍याच्या दिवशी सायंकाळी सर्व ग्रामस्थ सीमोल्लंघनासाठी आले. तिथे एकमेकांना सोने (आपट्याची पाने) देऊन अभिवादन केले. घरी गेल्यावर सुहासिनींकडून औक्षण केले गेले. यानंतर रात्री दहा वाजता नागरिक देवीच्या मुख्य यात्रेसाठी मंदिरात आले. यावेळी देशमुख घराण्याची वंशज निळकंठ देशमुख, शंकर देशमुख व देवीचे पुजारी जगदंबा ( यमाई) देवीला कौल (प्रसाद) मागण्यासाठी देवीसमोर बसले. कौल (प्रसाद) मागण्यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर करण्यात आला. आराधना करत असतानाच निळकंठ देशमुख यांनी ‘आईसाहेब’ अशी हाक त्यांनी दिली. याचवेळी देवीचे उजव्या बाजूचे फुल (प्रसाद) हातात पडल्यानंतर सर्व भाविकांनी गुलालाची उधळण करीत देवीचा जल्लोष केला.

शंकर देशमुख यांच्या छातीला जगदंबा देवी व तुकाई देवीचे मुखवटे बांधून त्यांना पालखी जवळ आणले जाते. यानंतर मुखवटे पालखीमध्ये ठेवले जातात. त्यावेळी भाविकांनी एकच जल्लोष करीत पालखीवर गुलाल आणि खोबर्‍याचे मुक्तहस्ते उधळण केली. सिंहाच्या आवारात पालखी आल्यानंतर भक्तीच्या या अनोख्या सागरात भान हरपून भाविक भक्तिरसात चिंब झाले; रात्री मंदिरातून पालखीने प्रस्थान ठेवले. सकाळी पालखी गावाच्या मुख्य रस्त्यावर आली. यानंतर दिवसभर संपूर्ण गावात पालखी प्रदक्षिणा घातली. यावेळी गावातील महिलांनी पालखी मार्गावर सडा, मनमोहक रांगोळ्या काढल्या.

गावातील प्रत्येक रस्त्यावर पालखीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यात्रेमुळे सर्व रस्ते बाजारपेठेत अलोट गर्दी होती. कोरोनाच्या कालावधीनंतर प्रथमच संसार उपयोगी साहित्य, स्टेशनरी, कटलरी, खेळणी, मिठाईच्या दुकाने थाटली होती. यात वाढ झाल्याचेही दिसून आले. यावेळी पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बंदोबस्त ठेवला.

महिलांना धक्काबुक्की होऊ नये, तसेच चोर्‍या होऊ नयेत, याची खबरदारी घेऊन पालखी सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी जगदंबा देवी ट्रस्टला या बाबत रथावर ‘सीसीटीव्ही’कॅमेरे बसवण्याबाबत चर्चा केली. यास ट्रस्टने सकारात्मक प्रतिसाद देऊन पालखी रथावर आठ ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले. पालखी मिरवणुकी दरम्यान ज्यांचे दर्शन होईल त्यांनी तत्काळ बाजूला व्हावे, ज्यांना दर्शन घ्यायचे त्यांनी दर्शन घ्यावे, अशा प्रकारची सूचना सर्वच पदाधिकारी, पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आली. पालखी मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास त्यावर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक यादव यांनी अवाहन केले होते.

जगदंबा पालखी सोहळ्यावर होती ‘सीसीटीव्ही’ची नजर
पालखी प्रदक्षिणा मार्गावर असताना महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच घडल्यास लक्ष ठेवता यावे, यासाठी पालखी रथावर आठ ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले.

मुस्लिम बांधवांचाही सहभाग
महाराष्ट्र राज्यातून आलेल्या भाविकांची ठिकठिकाणी पालखी दर्शनासाठी झुंबड उडाली होती. पालखी मंदिरात गेल्यावर सोहळ्याची सांगता झाली. या महोत्सवात मुस्लिम बांधव सर्व सेवेकरी, पुजारी, राशीन परिसरातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Back to top button