नगर: कोपरगाव बाजार समिती निवडणुकीचा बिगुल डिसेंबर मध्ये वाजणार | पुढारी

नगर: कोपरगाव बाजार समिती निवडणुकीचा बिगुल डिसेंबर मध्ये वाजणार

कोपरगाव: गेल्या अडीच वर्षांत कोरोना महामारीमुळे होऊ घातलेल्या अनेक निवडणुका रद्द झाल्या. त्यातच राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे तीनचाकी सरकार सत्तेतून पायउतार झाले आणि शिंदे-फडणवीस शासन सत्तेत आले. आता कोपरगाव बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल डिसेंबरमध्ये वाजला जाऊन प्रत्यक्ष मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य सहकार निवडणुक प्राधिकरण, पुणे येथील सचिव डॉ. पी. एल. खडांगळे यांनी सप्टेंबरमध्ये त्याबाबतचे परिपत्रक प्रसिध्द केले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत आता १० आर क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्याऐवजी बाजार क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्राथमिक कृषि पतसंस्था, बहुउददेशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे.

स्थानिक पातळीवर अशा सदस्य यादीची पुर्तता करून जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी अहमदनगर यांच्याकडे १ नोव्हेंबर रोजी दाखल करावयाची आहे. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली जाईल. त्यावर २३ नोव्हेंबरपर्यंत हरकती व आक्षेप मागविले जाणार आहेत. आलेल्या आक्षेप हरकतीवर २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२२ पर्यंत निर्णय देऊन अंतिम मतदार यादी ७ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिध्द होईल. तर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम २३ डिसेंबर २०२२ रोजी जाहिर होऊन २९ डिसेंबर २०२२ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, ३० डिसेंबर २०२२ रोजी छाननी, २ ते १६ जानेवारी २०२३ पर्यंत माघार, २९ जानेवारी २०२३ ला मतदान, तर मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होईल.

Back to top button