

देवदैठण, पुढारी वृत्तसेवा: श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी येथील अवैध दारूविक्री कायमची बंद करण्यासाठी सरपंच ठकसेन शिर्के यांच्या पुढाकारातून येथील रणरागिणी वज्र्रमूठ आवळत पुन्हा सरसावल्या आहेत. या महिलांनी गावातील दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन त्यांना दारू विक्री बंद करण्याची विनंती करून चांगलीच समज दिली.
काही स्थानिक लोकच गावात राजरोसपणे अवैध दारु विक्री करत असल्याने गावात ज्येष्ठांसह तरूण दारूच्या आहारी जात आहेत. अनेकांचे संसार दारूपायी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामपंचायतीने अनेकवेळा अवैध दारूबंदी विषयी ग्रामसभेचे ठराव घेऊन बेलवंडी पोलिस ठाण्यासह सर्व विभागाला देण्यात आले. मात्र, तेवढ्यापुरत्या जुजबी कारवाईनंतर दारू व्यावसायिक पुन्हा नव्या जोमाने दिवसाढवळ्या राजरोसपणे अवैध दारूविक्री करत असल्याने निंबवीकर ग्रामस्थ पुरते त्रस्त झाले आहेत. यापूर्वी महिलांच्या संघटनामुळे दारूबंदी झाली होती.
मात्र, पुन्हा दारूविक्री होत असल्याने दारूबंदी करण्यासाठी रौद्ररूप धारण करून महिला पुन्हा सरसावल्या आहेत. आता मात्र कायमचीच दारुबंदी झालीच पाहिजे, असा निर्धार करत सरपंच ठकसेन शिर्के यांच्या पुढाकाराने उपसरपंच गीता बीडेकर, माजी सरपंच सुरेखा शिर्के, माजी उपसरपंच सुमन गावडे, पार्वती शिर्के, संजना गावडे, उज्ज्वला धानगुडे, शालन गावडे, सुमन बीडेकर आदी महिलांनी एकत्र येत सोमवारी (दि. 3) गावातील दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन त्यांना दारू बंद करण्याची विनंती करून चांगलीच समज दिली.
यावेळी माजी सैनिक नानासाहेब महाडिक, माजी सैनिक मोहन गावडे, शिवाजी गावडे, दत्तात्रय धानगुडे, उतम शिर्के, तुकाराम शिर्के, सुरेश शिर्के, विजय गावडे, अमोल गावडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.