नगर : सोनेतारणात साडेसहा कोटींनी फसवणूक! | पुढारी

नगर : सोनेतारणात साडेसहा कोटींनी फसवणूक!

नगर; पुढारी वृत्तसेवा: शहर सहकारी बँकेसह संत नागेबाबा पतसंस्थेची एकत्रित बनावट सोनेतारण प्रकरणात आतापर्यंत तब्बल साडेसहा कोटींनी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. शहर सकारी बँकेत 11 हजार 568 गॅ्रम, तर संत नागेबाबामध्ये नऊ हजार 432 ग्रॅम बनावट सोने आढळून आले आहे. तसेच, याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, शंभरपेक्षा जास्त जणांचा गुन्ह्यांत समावेश करण्यात आला आहे. शहर सहकारी बँकेतील बनावट सोनेतारण प्रकरण उघडकीस आल्यानंतर संत नागेबाबा पतसंस्थेच्या कर्जखात्यांची तपासणी करण्यात आली.

त्यामध्येही, मोठ्या प्रमणात बनावट सोने आढळून आल्याने गुन्ह्यांची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे बनावट सोनेतारण प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शोखेकडून करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घेतला. शहर बँकेतील 40 कर्जदारांच्या 40 खात्यांमधून तीन कोटी 13 लाख 24 हजार 497 रुपये किंमतीचे सुमारे साडेअकरा किलो बनावट सोने आढळून आले आहे. तसेच, संत नागेबाबा सोसायटीच्या 150 खात्यांमध्ये तीन कोटी 20 लाख रुपये किंमतीचे सुमारे साडेनऊ किलो बनावट सोने आढळून आले आहे. शहर बँकेसह, नागेबाबामध्ये आतापर्यंत 22 किलो बनावट सोने आढळून आले आहे.

तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे
बनावट सोनेतारण प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यांनी तपासाला चांगलीच गती दिली होती. दरम्यान, प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याने पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून होणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील आव्हाड यांच्याकडे हा तपास सोपविण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Back to top button