कोळगाव : साकळाई पाणी योजनामुळे फुलणार दुष्काळी शेती | पुढारी

कोळगाव : साकळाई पाणी योजनामुळे फुलणार दुष्काळी शेती

कोळगाव; पुढारी वृत्तसेवा: श्रीगोंदा व नगर तालुक्यांना वरदान ठरणारी साकळाई पाणी योजना खासदार सुजय विखे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेऊन मार्गी लावल्याने साकळाई कृती समितीच्या वतीने आनंद व्यक्त केला. गेली 35 वर्ष ही योजना चालू करण्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते ,ग्रामस्थ, शेतकरी त्या सर्वांना याचे श्रेय जाते. दोन्ही तालुक्यांतील दुष्काळी भाग हा ओलिताखाली येणार असून बागायती क्षेत्र वाढण्यास मदत होणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे व रामदास झेंडे यांनी दिली.

साकळाई पाणी योजनेची 15 ऑक्टोबर पर्यंत अंतिम निविदा काढून डिसेंबर अखेर सर्वेक्षण पूर्ण होऊन आराखडा सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा खात्याला दिले आहेत. त्यासाठी दोन कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर केले असून, डिसेंबर 2022 नंतर चौथ्या सुधारित प्रशासकीय आराखड्यात साखळी योजनेचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी पुढील अर्थसंकल्पात निधी मंजूर केला जाणार असणार आहे. याचबरोबर डिंबे धरण व माणिक डोह धरणांतर्गत बोगदास मान्यता देण्यात आल्यामुळे कुकडी डावा कालव्याच्या प्रस्तावित मूळ क्षमतेने वाहता करण्यासाठी विशेष दुरुस्ती निधीसही मान्यता देण्यात आली आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बचत होऊन येडगाव धरणातील पाणीसाठा वाढणार आहे. त्याचा फायदा कुकडीतील लाभक्षेत्राला होणार आहे. ही योजना मार्गी लावण्यासाठी खासदार विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजी कर्डिले व जलसंपदा अधिकार्‍यांनी मदत केली, असे बाळासाहेब नलगे, पुरुषोत्तम लगड यांनी सांगितले.

लढा यशस्वी करण्यासाठी सिनेतारका व शिवसेना नेत्या दिपाली सय्यद भोसले, कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, रामदास झेंडे, अजिंक्य झेंडे, बाळासाहेब नलगे, पुरुषोत्तम लगड, हेमंत नलगे, राजाराम भापकर गुरुजी, हिवरे बाजारचे सरपंच रोहिदास उदमले, माजी सरपंच काटे, सरपंच सोमनाथ घाडगे,भाजपाचे राज्य सदस्य संतोष लगड, भरत भुजबळ, देविदास गोरे, साकळाई योजनेचे प्रवर्तक जगन्नाथ भोर, अभिलाष पाटील घिगे, प्रतिभा धस यांनी परिश्रम घेतले.

खासदारांच्या वजनाऐवढी शेरणी वाटणार
साकळाई पाणी योजना पूर्ण झाल्यास साकळाई देवीला, जे योजना पूर्ण करतील त्यांच्या वजना इतकी शेरणी वाटप करण्याचा छायाताई बाळासाहेब नलगे यांनी नवस केला होता. तो आता खासदार सुजय विखे पाटील यांच्या वजना इतकी शेरणी वाटप करून नवस पूर्ण करणार असल्याची माहिती नलगे यांनी दिली.

Back to top button