शिर्डीत श्रीसाई दरबार वेधणार भाविकांचे लक्ष! श्रीसाईबाबा पुण्यतिथी सोहळ्याची तयारी पूर्ण | पुढारी

शिर्डीत श्रीसाई दरबार वेधणार भाविकांचे लक्ष! श्रीसाईबाबा पुण्यतिथी सोहळ्याची तयारी पूर्ण

शिर्डी; पुढारी वृत्तसेवा: श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) च्या वतीने आयोजित 104 व्या श्रीसाईबाबा पुण्यतिथी उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, मुंबई येथील द्वारकामाई मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाईसह सर्व धर्म समभाव व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर ‘श्रीसाई दरबार’ हा भव्य देखावा प्रवेशद्वारावर उभारला आहे. उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितले.

बानायत म्हणाल्या, जगभरात श्रीसाईबाबांचे लाखो साईभक्त आहेत. श्रींच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सदगुरुंचा आशीर्वाद घेण्याकरीता ते शिर्डीला येतात. त्यामुळे श्रींच्या समाधीच्या दर्शनाकरीता साईभक्तांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरासह चावडीसमोर, मारुती मंदिर ते शाम सुंदर हॉल, समाधी मंदिराच्या दक्षिण बाजूकडील पालखी मार्ग, साई उद्यान परिसर, जुना पिंपळवाडी रोड दर्शन रांग व नवीन श्रीसाई प्रसादालय परिसर आदी ठिकाणी 52 हजार चौरस फुटांचे मंडप उभारले आहेत. अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी भक्त निवासस्थान (500 रुम) येथे 4 , 500 चौरस फूट मंडप उभारला आहे.

आवश्यकतेनुसार अतिरिक्त लाडू विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन केले आहे. दर्शन रांगेसह परिसरात भक्तांना चहा, कॉफी व दूध सुलभतेने मिळावे, यासाठी श्रीसाई कॉम्प्लेक्स, साई आश्रम, धर्मशाळा, भक्त निवासस्थान (500रुम), व्दारावती भक्त निवासस्थान, श्रीसाई उद्यान इमारत परिसर, शांती निवास इमारत दर्शन रांगेत तळमाळा व पहिल्या माळ्यावर चहा व कॉफीची अतिरिक्त व्यवस्था केली आहे.

उत्सव काळात भक्तांच्या सोयीसाठी दर्शन रांग, मंदिर परिसर, साई आश्रम व नवीन श्रीसाई प्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. तातडीचे सेवेसाठी मंदिर परिसर, नवीन भक्त निवासस्थान व नवीन श्रीसाई प्रसादालय येथे रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहे. संस्थानने श्रीसाईबाबा मंदिर, मंदिर परिसर, सर्व निवास स्थाने, श्रीसाईप्रसादालय आदी ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

श्रीपुण्यतिथी उत्सवा निमित्त समाधी मंदिर व मंदिर परिसर, द्वारकामाई, चावडी व गुरुस्थान येथे हैद्राबाद येथील दानशूर साईभक्त ए. महेश रेड्डी यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. उत्सवाच्या प्रथम दिवशी मंगळवार दि.4 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता अंजली श्रीकृष्ण जोशी (डोंबिवली) यांचे कीर्तन, तर सायंकाळी 7.30 ते रात्री 10 यावेळेत संजय गिरीदास जोशी (नांदेड) यांचे गीत रामायण होणार आहे.

उत्सवाच्या मुख्य दिवशी बुधवारी (दि. 5) सकाळी 10 वा. अंजली श्रीकृष्ण जोशी यांचे कीर्तन तर सायंकाळी 7.30 ते रात्री 10 यावेळेत निरजा पालवी (भोपाळ) यांचा भजन संध्या कार्यक्रम होईल. तृतीय दिवशी गुरुवारी (दि.6) रोजी दुपारी 4 वा. अंजली श्रीकृष्ण जोशी यांचे कीर्तन तर सायंकाळी 7.30 ते रात्री 9.15 यावेळेत मधुसूदन गोविंद भुवड (बोरिवली) यांचा साई द्वारकामाई गीत, संगीत, नृत्य कार्यक्रम होईल. उत्सव सांगतादिनी शुक्रवारी (दि.7) रोजी सकाळी 10 वा. अंजली श्रीकृष्ण जोशी यांचे काल्याचे कीर्तन, तर सायंकाळी 7.30 ते रात्री 9.45 यावेळेत गायिका गोविंद सखाराम देशपांडे यांचा सुगम संगीत कार्यक्रम होईल.

उत्सव काळात कीर्तन समाधी मंदिरा शेजारी स्टेजवर, तर निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम श्रीहनुमान मंदिराशेजारी श्रीसाईबाबा समाधी शताब्दी मंडप स्टेजवर होणार आहेत. भिक्षा झोळी कार्यक्रमात सहभाग घेवु इच्छिणार्‍यांनी नावे आज (दि.4) रोजी सकाळी 8 ते 11.30 यावेळेत देणगी कक्षात नोंदवावी.

त्याच दिवशी दुपारी 1.10 वा. समाधी मंदिर स्टेजवर सोडत पध्दतीने भाग्यवान भक्तांची निवड होईल. नावे निवडलेल्या भक्तांनाच भिक्षा झोळी घेता येईल. उत्सवाच्या मुख्य दिवशी (दि.5) रात्री 10 ते पहाटे 5 यावेळेत होणार्‍या कलाकारांच्या हजेरी कार्यक्रमास इच्छुक कलाकारांनी नावे समाधी मंदिराशेजारी अनाऊन्समेंट रुममध्ये नोंदवावी, असे सांगत, उत्सव कालावधीत श्रीसाई सत्यव्रत पूजा (सत्यनारायण पूजा), अभिषेक पूजा व वाहन पूजा बंद ठेवण्यात येणार असल्याचे बानायत यांनी सांगितले.

उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थान तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश सुधाकर यार्लगड्डा, सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थान उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.

150 क्विंटल मोतीचूर लाडू प्रसाद पाकिटे..!
श्रीसाई भक्तांकरीता सुमारे 150 क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकीटे तयार केले आहे. उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावेत, यासाठी श्रीसाईनाथ मंगल कार्यालय, द्वारकामाईसमोर खुले नाट्यगृह, मारुती मंदिराशेजारी साई कॉम्प्लेक्स, श्रीसाई प्रसादालय, सेवाधाम इमारत, निवासस्थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र आहेत.

Back to top button