भगवानगडाच्या पायथ्याशी परवानगी नाकारली तरी सीमोल्लंघन! : आयोजक | पुढारी

भगवानगडाच्या पायथ्याशी परवानगी नाकारली तरी सीमोल्लंघन! : आयोजक

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : भगवानगडाच्या पायथ्याला दसर्‍याच्या दिवशी आम्ही सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम करत, सीमोल्लंघन करणार आहोत. या कार्यक्रमावर टीका करत काही जण आपली पोळी भाजत असून, या कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही हा कार्यक्रम आम्ही घेणारच, अशी माहिती आयोजक बाळासाहेब सानप, शिवराज बांगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस राजेंद्र दगडखैर, रमेश घुले, सुधीर खेडकर उपस्थित होते. या वेळी सानप व बांगर म्हणाले, हा कार्यक्रम करणार म्हणून आम्हाला अनेकजण धमक्या देत आहेत. त्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा.

संत परंपरेत जन्मस्थळाला नव्हे, तर कर्मस्थळाला महत्त्व असल्याने भगवानगडाला पूर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी हा कार्यक्रम करत आहोत. दुसर्‍यांच्या मेळाव्याला जाऊ नका, असे आम्ही म्हणत नाही. पण, गडापेक्षा कोणी मोठा नाही. गडाचे महत्त्व स्व. गोपीनाथ मुंडे यांनी ओळखले होते. या उत्सवाला विरोध करणारेच आता आमचा सत्कार करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून पोलिस बंदोबस्तात भाविकांना बाबांच्या समाधीचे दर्शन घ्यावे लागत आहे. गडाचे हे स्वरूप आम्हाला बदलावयाचे आहे. पक्ष, नेता व भाषणविरहित हा कार्यक्रम आम्ही करणार असून, या वेळी व्यासपीठावर फक्त भगवानबाबा व स्व. मुंडे यांच्या प्रतिमा ठेवल्या जाणार आहेत. वाजत गाजत आम्ही गडावर जाऊन बाबांच्या समाधीचे दर्शन घेणार आहोत. आमच्या दृष्टीने भगवानगड सर्वोच्च असून, गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असल्याचेही ते शेवटी म्हणाले.

Back to top button