कर्जतमध्ये उडदाची मातीमोल दराने खरेदी ; शासकीय हमीभाव खरेदी केंद्र बंद | पुढारी

कर्जतमध्ये उडदाची मातीमोल दराने खरेदी ; शासकीय हमीभाव खरेदी केंद्र बंद

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : शासकीय हमीभाव उडीद खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्यामुळे व्यापारी झाले मालामाल आणि शेतकरी मात्र कंगाल, अशी गंभीर परिस्थिती कर्जत तालुक्यात निर्माण झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र अजूनही सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. व्यापारी मातीमोल भावाने शेतकर्‍यांचे उडीद धान्य खरेदी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवक अध्यक्ष नितीन धांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की राज्यात सत्तेवर आलेले भाजप व शिंदे यांचे खोके सरकारला शेतकर्‍यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही.

शेतकर्‍यांच्या हिताचे जोपासणारे महाविकास आघाडीचे सरकार खोक्यांचा वापर करून पाडले. राज्यातील शेतकरी व जनतेला वार्‍यावर सोडून दिले आहे. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारामधून यापूर्वी मतदारसंघांमध्ये शेतकर्‍यांची खरीप व रब्बी पिके तयार होण्यापूर्वीच अनेक शासकीय हमीभाव खरेदी केंद्रे सुरू होत होती. यामुळे त्याचा फायदा शेतकर्‍यांना झाला. मात्र, यावेळी शेतकर्‍यांनी वारंवार मागणी करूनही शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत.

आज शेतकर्‍यांच्या खरीप पिकांमध्ये उडीदाला शासकीय हमीभाव सहा हजार सहाशे रुपये असताना प्रतीक्षात तीन ते चार हजार रुपयांनी व्यापारी शेतकर्‍यांचा उडीद खरेदी करीत आहेत. हाच उडीद आता हमीभाव केंद्र सुरू झाल्यानंतर सरकारला विकण्याचा डाव व्यापारी साधणार आहेत यामुळे आज तालुक्यामध्ये शेतकरी कंगाल व व्यापारी मालामाल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका करून धांडे म्हणाले की, राज्यातील सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आज केंद्र व राज्य सरकार शेतकर्‍यांच्या कांद्याला भाव देत नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

मातीमोल भावाने कांदा विकावा लागत आहे. शेतकर्‍यांविषयी कुठलीही आस्था नसलेल्या सरकार राज्यात व देशात सत्तेवर असल्यामुळे पुढील काळामध्ये शेतकर्‍यांना आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. राज्य सरकारने तातडीने व्यापार्‍यांना हमीभावाने उडीद खरेदी करणे विषयी सक्ती करावी . जे हमीभावापेक्षा कमी दराने उडीद खरेदी करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच कांद्याला हमीभाव द्यावा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धांडे यांनी दिला आहे.
दरम्यान, तालुक्यातील शेतकर्‍यांनी महागडे बियाणे, खते खरेदी करून उडीद पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी कली. यंदा पाऊसही समाधानकारक झाल्याने उत्पादनही चांगले झाले. मात्र, व्यापारी हमीभावापेक्षा निम्म्याच भावाने उडीद खरेदी करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने हमीभाव खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे, अशी शेतकर्‍यांमधून मागणी होत आहे.

Back to top button