जामखेड : लोकसहभागातून 350 किलो आहार जमा, राष्ट्रीय पोषण महिना साजरा | पुढारी

जामखेड : लोकसहभागातून 350 किलो आहार जमा, राष्ट्रीय पोषण महिना साजरा

जामखेड : पुढारी वृतसेवा :  राष्ट्रीय पोषण महिना जामखेडमध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दानशूरांकडून आपल्या मुलांच्या वजनाइतका पोषक आहार तुला करून देण्यात आला. यावेळी लोकसहभागातून 350 किलो पोषक आहार जमा झाला. जामखेड येथे पोषण तुला कार्यक्रम घेण्यात आल्याने याचा फायदा तालुक्यातील कुपोषित बालकांना होणार आहे. तसेच यावेळी अंगणवाडी सेविका व बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या विविध पौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते. तालुक्यातील कुपोषित मुलांच्या आहारासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करावी यासाठी पोषण तुला कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच इच्छुक व दानशूर पालकांनी आपल्या मुलांची पोषण तुला करून तेवढ्या प्रमाणात पौष्टिक आहार अंगणवाडीतील कुपोषित बालकांसाठी दिला आहे.

यामध्ये एकूण 70 किलो शेंगदाणे, 70 किलो गूळ, 50 किलो सफरचंद, 70 डझन केळी, आठ किलो फुटाणे, पाच किलो डाळी, विविध कडधान्य, काजू , बदाम, खजूर, राजगिरा लाडू, भरडा असे विविध पदार्थ जमा झाले आहे. सदर पदार्थ सॅम श्रेणीतील कुपोषित बालकांना दररोज अंगणवाडी केंद्रात खाऊ घालून त्यांची वजन वाढ होऊन त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी उपयोगात आणली जाणार आहेत.

यावेळी 125 मुलींची किशोरवयीन मुलींची आरोग्य व एचबी तपासणी करण्यात आली. प्रत्येक अंगणवाडीमध्ये स्वस्थ बालक-बालिका स्पर्धा घेण्यात आली. शुक्रवारी (दि.30) पोषण महिन्याचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला त्यामधील तालुकास्तरीय प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ क्रमांक यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम ल. ना. होशिंग महाविद्यालयात घेण्यात आला.

यावेळी प्रांताधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, गटशिक्षणाधिकारी खैरे, सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार, कृषी अधिकारी अशोक शेळके, ल. ना. होशिंग महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत सर, अंगणवाडी सेविका, पालक, मुली उपस्थित होते.

Back to top button