एसटीनेच केला अमरापूरला ‘रास्ता रोको’! | पुढारी

एसटीनेच केला अमरापूरला ‘रास्ता रोको’!

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : अमरापूर-शेवगाव राज्यमार्गावर बिघाड झाल्याने एस.टी बसनेच रास्ता रोको आंदोलन केल्याचे दृश्य शनिवारी (दि.30) अमरापूर येथे पाहावयास मिळाले. होते. रस्त्यावर आडव्या एसटीमुळे बराच काळ वाहतूक खोळंबली होती. ट्रॅक्टरच्या साहाय्याने ही बस बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. प्रवाशांसह खास शालेय विद्यार्थ्यांसाठी अमरापूर ते पाथर्डी प्रवासासाठी दररोज सकाळी सात वाजता पाथर्डी आगारची बस आहे. शनिवारी (दि.1) नेहमीप्रमाणे ही बस (क्र.एम.एच.40 वाय 5440) सकाळी अमरापूर येथे आली.

येथून परत माघारी जाण्यासाठी ती वळण घेत असताना शेवगाव राज्यमार्गावर मधोमध आडव्या स्थितीत तिचा बिघाड झाला. काही ग्रामस्थांच्या मदतीने बसला धक्का देण्याचा असफल प्रयत्न झाल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली. तर, काही वाहने अडखळत रस्त्याच्या बाजूने जाण्या-येण्याचा प्रयत्न करत होते.

वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्याने अखेर एक तासाने ट्रॅक्टरच्या साहाय्याने ही बस बाजूला करण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत झाली. मात्र अमरापूर, काळेगाव, साकेगाव, डांगेवाडी येथून सकाळी पाथर्डी शहरात शिक्षण घेण्यास जाणार्‍या विद्यार्थ्यांची काही तास शाळा बुडाली. कोरोना काळात एस.टी. वाहतुक बंद होती. त्यामुळे ही वाहने नादुरुस्त झाली आहेत. त्यांची व्यवस्थित देखभाल व दुरुस्ती झाली नसल्याने बिघाड होत असावा अशी शंका काही प्रवासी या प्रकारानेे व्यक्त करीत होते.

Back to top button