भगवानगड पाणी योजनेस आदेश : आमदार मोनिका राजळे | पुढारी

भगवानगड पाणी योजनेस आदेश : आमदार मोनिका राजळे

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : भगवानगड परिसर व 46 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन, 178 कोटी 80 लाख रूपये खर्चाच्या कामास 29 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून कार्यरंभ आदेश देण्यात आला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत या योजनेस केंद्र शासन व राज्य शासनाचा प्रत्येकी पन्नास-पन्नास टक्के निधी प्राप्त होणार असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. भगवानगड व परिसरातील गावाच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार मोनिका राजळे यांनी शासनाकडे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

महंत आदिनाथ महाराज शास्त्री व भाविकांच्या मागणीनुसार श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचाही या योजनेत समावेश केला. या योजनेसाठी 190 कोटी 88 लक्ष रुपये खर्चाच्या अंदापत्रकास व आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. प्रशासकीय मान्यतेनंतर आमदार मोनिका राजळे यांनी लाभार्थी गावांच्या सरपंचांची बैठक आयोजित करून गावांची पाणीपुरवठा समिती गठीत केली. येळीचे सरपंच संजय बडे यांची पाणी योजना समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर 29 सप्टेंबर रोजी 178 कोटी 80 लाख रुपये या किमतीच्या अंदाजपत्रकास मे.विजय कन्ट्रक्शन व्ही.यू.बी. इंजिनिअरिंग प्रा.लि.(जे.व्ही.) मुंबई या कंपनीस कार्यरंभ आदेश पारित करण्यात आला. आता या पाणी योजनेच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होऊन गती येईल. योजनेला कार्यारंभ आदेश मिळाल्याबद्दल आ.राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले.

Back to top button