नगर : झेडपी अध्यक्षपद अनुसूचित जमातीला अनेक दिग्गजांचा झाला भ्रमनिरास | पुढारी

नगर : झेडपी अध्यक्षपद अनुसूचित जमातीला अनेक दिग्गजांचा झाला भ्रमनिरास

नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण नुकतेच काढण्यात झाले असून, यात नगरचे अध्यक्षपद हे अनुसूचित जमातीला गेले आहे. मात्र, त्यामुळे सर्वसाधारणमधून इच्छुक असलेल्या अनेक मातब्बरांचा भ्रमनिरास झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, या आरक्षणामुळे अशोकराव भांगरे व मिस्टर शेलार यांच्यानंतर पुन्हा ही संधी अनुसूचित जमातीच्या सदस्याला मिळणार आहे.
जिल्हा परिषद म्हणजे ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू आहे,येथे विकासकामाचे मोठे बजेट असल्याने मिनी मंत्रालय म्हणूनही झेडपीला संबोधले जाते. त्यामुळे झेडपी अध्यक्ष पदाला कॅबिनेट मंत्र्यांचा (लाल दिवा) दर्जा आहे.

त्यामुळे अनेकांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी आणि पुढे अध्यक्षपद मिळविण्यासाठी आतापासूनच तशी फिल्डिंग लावली होती. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरही मोर्चेबांधणी सुरू झालेली होती. मात्र, काल झेडपी अध्यक्षपदाचे आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी निघाल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे पहिले अडीच वर्षे तरी सर्वसाधारणमधून निवडून येणार्‍या दिग्गजांना अध्यक्षपदासाठी वाट पहावी लागणार आहे.

झेडपीचे गट नेमके 73 की 85?
जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षण निघाल्याने आता इच्छुकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. मात्र, आघाडी सरकारने 85 गट आणि 170 गण आराखडा तयार केला होता. आरक्षण सोडतही निघाली होती. मात्र, शिंदे सरकारने नवीन गट गणांना ब्रेक देऊन पूर्वीच्या 73 गट आणि 146 गणांची रचना कायम ठेवली आहे. त्यामुळे आगामी निवडणूक नेमकी किती गटांची होणार, आरक्षण सोडत पुन्हा निघणार का, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

Back to top button