श्रीगोंदा : कुकडीचे 10 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ; अध्यक्ष राहुल जगताप यांची माहिती | पुढारी

श्रीगोंदा : कुकडीचे 10 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ; अध्यक्ष राहुल जगताप यांची माहिती

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : कुकडी सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षी उच्चांकी गाळप केले. चालू वर्षी तालुक्यात उसाचे क्षेत्र चांगले असल्याने दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे टार्गेट ठेवले असून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे कुकडी कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी सांगितले. कुकडी कारखान्याचा 19 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शुक्रवारी (दि. 30) झाला. त्यावेळी जगताप बोलत होते. तत्पूर्वी सुजाता खरात व रामदास खरात, प्रियंका औटी व प्रदीप औटी, ज्ञानेश्वरी इथापे व प्रशांत इथापे, वैशाली जमदाडे व शरद जमदाडे, प्रतीक्षा मेंगवंडे व धनंजय मेंगवडे यांच्या हस्ते बॉयलरचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा, अण्णासाहेब शेलार,डॉ.प्रणोती जगताप, विवेक पवार, बाळासाहेब शेलार, ऋषिकेश गायकवाड, मनोहर पोटे, सचिन जगताप, हेमंत नलगे, धनंजय औटी, कल्याण जगताप, वसंत जगताप, कार्यकारी संचालक डी. एन.मरकड उपस्थित होते.

अध्यक्ष जगताप म्हणाले, तालुक्यात यंदाही उसाचे क्षेत्र चांगले आहे. उसतोडणीसाठी टोळ्यांचे नियोजन केले असून कारखाना 10 ऑक्टोबरच्या आसपास सुरू करण्याचा आमचा मानस आहे. गेल्या वर्षी उशीरा कारखाना सुरू झाल्याने नऊ लाखांचा टप्पा गाठता आला नाही. यावर्षी मात्र लवकरच कारखाना सुरू होणार असल्याने दहा लाखांचा टप्पा पार करू. ऊसतोडणीच्या बाबतीत कोणवरही अन्याय होणार नाही याची आम्ही पुरेपूर खबरदारी घेत आहोत.

भोस म्हणाले, सहकारी कारखानदारी ही शेतकर्‍यांच्या विश्वासावर टिकून आहे. अनेक अडचणी असतानाही सहकारी कारखानदारी सुरू आहे, ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. नाहाटा म्हणाले, राहुल जगताप यांनी कुकडी कारखान्यात सकारात्मक बदल करून कारखान्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इथे येणार्‍या प्रत्येक व्यक्तिला मिळणारी सन्मानाची वागणूक इतर ठिकाणी पहायला मिळत नाही. शेलार म्हणाले, तात्यांच्या निधनानंतर राहुल जगताप कारखाना कसा चालवतात, याची परीक्षाच झाली. दादा या परीक्षेत पास झाले. स्वप्नात नसणारा कारखाना प्रत्यक्षात उभा करून तो योग्यरितीने चालवणे, यातच जगताप यांचे यश सामावलेले आहे.
सूत्रसंचालन सुनील ढवळे, आभार संभाजी देवीकर यांनी मानले.

Back to top button