आजोबांच्या लौकिकासाठी ‘तनपुरे’ चालवून दाखवा ; खा. डॉ. सुजय विखे यांचे आ. तनपुरेंना आव्हान | पुढारी

आजोबांच्या लौकिकासाठी ‘तनपुरे’ चालवून दाखवा ; खा. डॉ. सुजय विखे यांचे आ. तनपुरेंना आव्हान

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : आंदोलने, बचाव कृती समिती व न्यायालयात धाव घेण्याच्या फंदात पडू नका. आम्ही कारखान्यातून बाहेर पडतो. मी आजोबांचे नाव उज्वल केले आता तसे तुम्ही तुमच्या आजोबांच्या नावावर असलेल्या डॉ.बाबुराव दादा तनपुरे कारखान्याची जबाबदारी घेऊन त्यांचे नाव उज्वल करून दाखवा असे खुले आवाहन भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांना दिले. कारखान्याची 67 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत डॉ. विखे बोलत होते. काखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे अध्यक्षतेस्थानी होते. कारखाना यंदा सुरू का?, कामगार, सभासदांसाठी कोणते हितकारक निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच खा. डॉ. विखे यांनी तनपुरे कारखान्याला आरोप-प्रत्यारोपाने त्रस्त होऊन रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. राहुरीकरांनो तुमचा कारभार तुम्ही चांगला करा, तुम्हाला साथ देतो, बंद पडलेला कारखाना सुस्थितीत आणल्यानंतरही भ्रष्टाचाराचे आरोप करीत आंदोलन व विरोधाची नौटंकी करणार्‍यांनी कारखाना चालवून दाखवावा असे आवाहन डॉ. विखे यांनी दिले.

प्रतिदिन 1 हजार 800 मे.टन ऊस गाळप करणारा कारखाना आता प्रतिदिन 4 हजार क्षमतेचा झाला आहे. कारखान्याची मशिनरी अत्याधूनिक केली आहे. खासदारकी काळात आपण तीन कारखाने चालवून दाखविले. आ. प्राजक्त तनपुरे यांनी आता प्रसाद शुगरसह डॉ. तनपुरे कारखाना सुरू करावा. जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी यंदाच्या गळीत हंगामात प्रत्येक उत्पादित साखर पोत्यामागे 500 रूपयांचे टॅगिंग ठेवत गाळपाची परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जमीन विक्रीचे आदेश दिले. पण विक्रीचा निर्णय आम्ही घेतला नाही. कारखान्याच्या देणीबाबत कोणतेही भाष्य न करता 13 ऑक्टोंबर रोजी न्यायालयातच मत मांडणार असल्याचे खा. विखे म्हणाले.
अध्यक्ष ढोकणे, भारत पेरणे, कारभारी कणसे, अनिल शिरसाठ, पंढरीनाथ पवार, चांगदेव तारडे, कारभारी खुळे, का’गार प्रतिनिधी सुनिल काळे, प्रहारचे आप्पासाहेब ढूस, शेतकरी संघटनेचे संजय पोटे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

व्यासपिठावर ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, माजी उपाध्यक्ष श्यामराव निमसे, विजय डौले. शिवाजी गाडे, सुरशिंग पवार, तान्हाजी धसाळ, उत्तमराव म्हसे, अर्जुन पानसंबळ, मच्छिंद्र तांबे, नंदकुमार डोळस, सुनिल अडसूरे, दत्तात्रय खुळे, रावसाहेब चाचा तनपुरे, आर.आर. तनपुरे, अमोल भनगडे, नानासाहेब गागरे, रविंद्र म्हसे, भैय्यासाहेब शेळके यांच्यासह संचालक, सभासद, कामगार उपस्थित होते. अमृत धुमाळ, माजी खासदार प्रसाद तनपुरे व सभासदांनी एकत्रित जमिन विक्री, कारखान्याच्या कारभाराबाबत टिका केली होती. सभेत विरोधकांची भूमिका महत्वाची होती. परंतु सभेकडे एकही विरोधक फिरकला नाही. त्याची उपटसुलट चर्चा सुरू होती.

 

कोट्यवधींचे कर्ज, बंद पडलेल्या तनपुरे कारखाना सुरू केल्यानेच राहुरीतून भरभरून मतदान मिळाल्याने खासदारकीत यश मिळाले. परंतु राहुरीकरांनी आमदकारकीच्या निवडणुकीत बदल केला. कारखाना एकाकडे अन् आमदारकी दुसर्‍याकडे, हे योग्य नाही. त्यामुळे जे आमदार झाले त्यांनीच कारखाना सुरू करून सभासद, कामगारांचे हित जोपासणे गरजेचे आहे.
                                                                       -खा. डॉ. सुजय विखे पाटील

 

…. म्हणून विखेंनी घेतला निर्णय
कोणत्याही शेतकर्‍यांची देणी थकीत असेल तर घर विकून ती अदा करेल, प्रंपचाला वेळ देणे गरजेचे आहे. त्यामुळे तनपुरे कारखान्याची जबाबदारी राहुरीकरांनी स्विकारावी. राहुरीत अनेक जुने जाणते व सहकार क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्व आहेत. जुन्या जाणत्या नेत्यांच्या नातवांनी आता कारखान्यासाठी पुढे यावे. शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे कारखान्यासाठी मोलाजी मदत केली. आता लोकप्रतिनिधी म्हणून आ. तनपुरे यांची जबाबदारी आहे. आरोप प्रत्यारोप हे राजकारणातील भाग आहे. डॉ. तनपुरे कारखाना चालविताना कधीच उणे दुणे काढले नाही. कारखाना सभासदांचा मालकीचा आहे. त्यामुळे तनपुरे कारखान्याच्या कारभारातून थांबा घेत आहे. कोणीही कारखाना चालविला तरी त्यास सर्वतोपरी मदत राहणार आहे. गत सात वर्षात काही चूक झाली असल्यास आपलं समजून माफ करा असे डॉ. विखे यांनी सांगितले.

भ्रष्टाचाराच्या आरोपाने विखे व्यथित
विखे कुटुंबियांचा तनपुरे कारखान्याचा साधा एक शेअर नाही. परकीय नेतृत्व असतानाही तनपुरे कारखान्यासाठी माझा स्विकार झाला हे अभिमानास्पद आहे. सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवित कामगार, सभासदांना योग्य न्याय दिला. तरीही विरोध, भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याचे पाहून आता तनपुरे कारखान्याच्या कारभाराबाबत थांबा घेत असल्याचे डॉ. विखे यांनी जाहीर केले.

Back to top button