कोपरगावकरांना मोठा दिलासा: अखेर वाढीव घरपट्टी आकारणीला स्थागिती, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

कोपरगावकरांना मोठा दिलासा: अखेर वाढीव घरपट्टी आकारणीला स्थागिती, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास
Published on
Updated on

कोपरगाव, पुढारी वृत्तसेवा: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले आणि प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या चर्चेनंतर कोपरगाव नगरपालिका हद्दीतील नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या वाढीव घरपट्टी आकारणीला स्थगिती देत असल्याचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी जाहीर केले. त्यानंतर एकच जल्लोष करत भाजपा, शिवसेना, रिपाई व मित्र पक्षांच्यावतीने गेल्या चार दिवसापासुन सुरु असलेले साखळी उपोषण मागे घेतले.

शहरातील सुमारे अडीचशेपेक्षा जास्त संघटनानी या उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त केल्याचे माजी आमदार कोल्हे यांनी यावेळी सांगितले. वाढीव कराचा बोजा कोपरगाव शहरवासियांवर पडणार होता. मात्र, त्यास स्थगिती दिल्याने सर्वच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, पराग संधान, सर्व आजी माजी नगरसेवक यांनी आनंद व जल्लोष व्यक्त करीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळयाला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांना पेढयांचे वाटप केले.

२७ सप्टेंबरपासून भाजप, शिवसेना, रिपाई व मित्र पक्षाचे आजी-माजी नगरसेवकांच्यावतीने शिवाजी महाराज पुतळयासमोर वाढीव घरपट्टीला स्थगिती देऊन चुकीचे सर्व्हेक्षण करणाऱ्या कंपनीला काळया यादीत टाकावे. तसेच त्यांच्याकडून ७५ लाख रूपये वसुल करावेत, या मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते. त्यास शहरातील विविध राजकीय, सामाजिक संघटनांनी तसेच नागरिकांनी मोठया प्रमाणात पाठिंबा दर्शवला. या मागण्या संदर्भात मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे प्राथमिक स्तरावर दोन तीन वेळा चर्चेच्या फेऱ्याही झाल्या. त्यांना अनेकवेळा ही वाढीव घरपट्टी आकारणी तात्काळ रद्द करावी म्हणून निवेदने देण्यात आले होते. परंतु याबाबत काही मार्ग निघाला नाही.

कोरोना महामारीमुळे गेल्या अडीच ते तीन वर्षापासुन आर्थिक चलनवलन ठप्प आहे. त्यातच शहरवासियांच्या डोक्यावर वाढीव घरपट्टीचा आकारणीचा बोजा टाकण्यात आला. त्यामुळे सर्वत्र पालिका प्रशासन व मालमत्तेचे सर्व्हेक्षण करणाऱ्या कंपनीच्या विरोधात असंतोष होता, तो साखळी उपोषणाने बाहेर पडला. दरम्यान मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाबाबत विविध बाबी तपासून त्याबाबतही येत्या पंधरा दिवसात निर्णय घेतला जाईल, असे प्रांताधिकारी शिंदे यांनी यावेळी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news