गोमांस वाहणार्‍या ‘द बर्निंग कार’चा थरार ! | पुढारी

गोमांस वाहणार्‍या ‘द बर्निंग कार’चा थरार !

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील सायखिंडीजवळ गोवंश मांस वाहतूक करणार्‍या अलिशान कारने अचानक पेट घेतल्यामुळे ‘द बर्निंग कार’चे चित्त थरारक सिनेस्टाईल दृश्य दिसले. दरम्यान, या निमित्ताने संगमनेर शहरात राजेरोसपणे कत्तलखाने आजही सुरुच असल्याचे पितळ उघडे झाले आहे.  याबाबत संगमनेर तालुका पोलिसांनी सांगितले की, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सायखिंडी शिवारात बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संगमनेरातून कत्तल केलेल्या गोवंश जनावरांचे मांस भरून अलिशान स्विफ्ट कार (क्र. एम एच.43ए.एफ.9598) मध्ये भरुन मुंबईच्या दिशेने निघाली होती, मात्र कार सायखिंडीफाटा शिवारातून जात असताना कारने अचानक पेट घेतला.

त्यामुळे चालकाने कार भर रस्त्यात सोडून देत तेथून पलायन केले. परिसरातील आसपासच्या नागरिकांनी धाव घेत पेटलेली कार विझविली. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत सुमारे 400 किलो गोवंश मांस भरल्याचे आढळले. याबाबत पो. काँ. ओंकार मेंगाळ यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी अज्ञात कार चालकावर महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. जळालेली कार जप्त केले आहे. कारमधील अर्धवट जळालेल्या गोवंश मांसाची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

Back to top button