श्रीरामपूर : देशाच्या विकासात बचत गटांचे अमूल्य योगदान ; केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल | पुढारी

श्रीरामपूर : देशाच्या विकासात बचत गटांचे अमूल्य योगदान ; केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकट्याचा नव्हे तर देशातील कोट्यवधी जनतेचा विचार करून निर्णय घेतले, असे सांगत महिलांचे सक्षमीकरणावर केंद्र शासनाचा विशेष भर आहे. अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये 20 लाख महिला काम करतात. देशाच्या विकासात महिला बचतगट व प्रक्रीया उद्योगातील महिलांचे अमूल्य योगदान असल्याचे प्रतिपादन देशाचे अन्न प्रक्रिया उद्योग व जल शक्ती विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी आज येथे केले. श्रीरामपूर येथे भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा प्रवास योजनेच्या निमित्ताने मंत्री प्रल्हाद पटेल यांनी केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. राहूल आहेर, भाजप प्रदेश कार्यालयाचे प्रभारी रवि अनासपुरे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष दीपकराव पटारे, शहराध्यक्ष मारूती बिंगले, प्रकाश चित्ते, नानासाहेब शिंदे, शरदराव नवले, भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष विठ्ठल राऊत, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रामपंचायत) सुरेश शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) रेश्मा होजगे उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री पटेल म्हणाले, देशात छोटे-मोठे उद्योग करणार्‍या 20 लाख महिला आहेत. अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी दरवर्षी 35 हजार लघुउद्योगांना कर्ज देण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. याबरोबरच जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येकास पिण्यायोग्य 55 लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. असे असले तरी पाण्याचा जपून वापर केला पाहिजे, असे त्यांनी सूचित केले. कोविड काळात देशातील प्रत्येक कुटुंबाला मोफत अन्नधान्य देण्यात आले. मोफत कोविड लसीकरण करण्यात आले. देशातील लोकांना मोफत औषधोपचार करून जगातील 150 पेक्षा जास्त देशांना आपण औषधे वाटप केली, असे मंत्री पटेल यांनी सांगितले.

भारत सध्या जगाची पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, असे नमूद करीत मंत्री पटेल म्हणाले, 2030 सालापर्यंत भारत जगात तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. त्यादृष्टीने सर्वसामान्यांचा विकास व महिला सक्षमीकरणासाठी शासनाला काम करायचे असल्याचे सांगत, प्रधानमंत्र्यांनी जात, धर्माच्या आधारावार योजना दिल्या नाहीत तर सर्व समाजातील घटकांचा विचार करून निर्णय घेतल्याचे मंत्री पटेल यांनी सांगितले.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. म्हणाले, केंद्र शासन शिक्षणापासून आरोग्यापर्यंतच्या सर्व मुलभूत गरजांवर काम करीत आहे. मोफत लसीकरण, धान्य वाटप, उज्ज्वला गॅस, आयुष्यमान भारत आरोग्य या केंद्राच्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात मुलभूत परिवर्तन झाले आहे. सध्या देशात सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. यात सर्वसामान्य नागरिकांच्या शासनाकडे प्रलंबित कामांचा निपटारा करण्याचे काम प्रशासनाने करावे. नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, यांची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

150 पेक्षा देशांना कोविड औषधांचे वाटप..!
कोेविडच्या आपत्तीत मोफत कोविड लसीकरण करण्यात आले. देशातील लोकांना मोफत औषधोपचार करून, जगातील तब्बल 150 पेक्षा जास्त देशांना आपण औषधे वाटप केली, असे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी सांगितले.

Back to top button