आमदार लकेंचा झावरे गटाला जोरदार धक्का | पुढारी

आमदार लकेंचा झावरे गटाला जोरदार धक्का

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वासुंदे येथील गुरुदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे यांच्यासह माजी उपसरपंच महादू भालेकर व सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष भिमाजी गायके, गजानन झावरे यांच्यासह वासुंदे गावातील अनेक पदाधिकार्‍यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या गटाला जोरदार धक्का बसला आहे.
दिवंगत आमदार वसंतराव झावरे यांचे समर्थकांनी खासदार सुप्रियाताई सुळे व महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी सुपे येथे जाहीर प्रवेश केला आहे.

स्थानिक नेतृत्वाला कंटाळून या पदाधिकारांनी प्रवेश केला. यावेळी खासदार सुळे व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत गुरूदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे, माजी सरपंच माऊली पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादू भालेकर, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष भिमाजी गायके, भागुजी झावरे, गजानन झावरे, उपाध्यक्ष रा.बा.झावरे, गजानन झावरे, ग्रामपंचायत सदस्य सुदाम शिर्के, स्वप्निल झावरे, संचालक रावसाहेब बर्वे, मनोहर झावरे, सीताराम जगदाळे, निवृत्ती झावरे यांनी प्रवेश केला. यावेळी जि. प. माजी सदस्या राणीताई लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे उपस्थित होते.

गेल्या दोन पिढ्यांपासून ज्यांना आम्ही मदत केली. त्यांच्याकडून अपमान व कायमच उपेक्षा होत असल्याने आमदार लंके यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचे बा.ठ.झावरे व माजी उपसरपंच महादू भालेकर यांनी सांगितले. स्व.आमदार वसंतराव झावरे यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी पक्षात प्रवेश केल्याचे माजी उपसरपंच महादू भालेकर म्हणाले. यावेळी खासदार सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशा केलेल्या पदाधिकारांना सन्मानाची वागणूक देतानाच योग्य वेळी पक्षात संधी दिली जाईल, असे आश्वासन दिलेे.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वासुंदे गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे झावरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

बा. ठ. झावरेंची पक्षाला गरज : लंके
तालुक्यातील वासुंदे येथील गुरूदत्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष बा.ठ.झावरे यांच्यासारख्या माणसांची पक्षाला व मला गरज आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या खांद्यावर डोके टेकविले असून, आता चिंता सोडा. आम्ही लोकांसारखे गळे आवळणारे नसून जीवाला जीव देणारे व जीव लावणारी माणसे आहोत. त्यामुळे वासुंदे गावाप्रती व माणसांप्रती वेगळी आस्था असून, त्यांच्या अनुभवाचा व कार्याचा मला फायदा होईल, असे आमदार लंके म्हणाले.

Back to top button