श्रीगोंदा : कांदाप्रश्नी आमदारांची डोळेझाक : राहुल जगताप; ढोकराई येथे रस्त्यावर कांदा ओतून रास्ता रोको | पुढारी

श्रीगोंदा : कांदाप्रश्नी आमदारांची डोळेझाक : राहुल जगताप; ढोकराई येथे रस्त्यावर कांदा ओतून रास्ता रोको

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या तीन दिवसांपासून कांदा प्रश्नावर आंदोलन सुरू आहे. मात्र, तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी, या आंदोलनाकडे डोळेझाक केली असल्याची टीका माजी आमदार राहुल जगताप यांनी दिली केली.
सध्या कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी बांधव पुरता अडचणीत आलेला आहे. कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी लिंपणगाव येथील शेतकरी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेले आहेत.

त्यांच्या समर्थनार्थ त्यांना पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्या नेतृत्वाखाली नगर-दौंड महामार्गावरील ढोकराई येथे गुरुवारी (दि.29) सकाळी 10 वाजता रस्त्यावर कांदा ओतून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी राहुल जगताप म्हणाले, तालुक्याच्या आमदारांनी आजारी असल्याचे सांगत शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली आहे. मागील चार दिवसांपासून कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. विद्यमान आमदारांचे सरकार राज्यात असल्याने त्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत पत्राद्वारे सरकारकडे पाठपुरावा करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झालेले दिसत नाही. आजारी असले तरी त्यांनी पत्राद्वारे या उपोषणाला पाठिंबा देण्याची गरज होती.

यावेळी घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, संजय आनंदकर, ऋषिकेश गायकवाड यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नायब तहसीलदार डॉ.योगिता ढोले यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Back to top button