नगर : आणखी 80 तोळे बनावट सोने ‘नागेबाबा’च्या फसवणुकीचा आकडा 2.70 कोटींवर | पुढारी

नगर : आणखी 80 तोळे बनावट सोने ‘नागेबाबा’च्या फसवणुकीचा आकडा 2.70 कोटींवर

नगर : पुढारी वृत्तसेवा : श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट सोसायटीमधील संशयित कर्ज खात्यांची तपासणी पोलिसांकडून सुरू असून, बुधवारी झालेल्या तपासणीत आणखी 80 तोळे बनावट सोने आढळून आले आहे. आतापर्यंत 48 आरोपींची 115 खाती तपासण्यात आली आहेत. त्यामध्ये दोन कोटी 70 लाख किंमतीचे सुमारे पावणेआठ किलो बनावट सोने आढळून आले आहे.  शहर सहकारी बँकेची बनावट सोनेतारणाखाली सुमारे साडेतीन कोटींनी फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर, संत नागेबाबा सोसायटीमधील फसवणुकीचा आकडा आता 2.70 कोटींच्या घरात गेला आहे.

याप्रकरणी गोल्ड व्हॅल्युअर अजय कपालेसह त्याचे साथीदार सुनील ज्ञानेश्वर अळकुटे, श्रीतेश रमेश पानपाटील, संदीप सीताराम कदम व सचिन लहानबा जाधव या पाच आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.  दरम्यान, याप्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच असून, आरोपींची संख्या 48 वर गेली आहे. या गुन्ह्याचा तपास कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.

Back to top button