रेखा जरे हत्याकांड : आरोप निश्चिती प्रक्रिया लांबणीवर ; गुन्ह्यातून वगळण्यावर 10 ला सुनावणी | पुढारी

रेखा जरे हत्याकांड : आरोप निश्चिती प्रक्रिया लांबणीवर ; गुन्ह्यातून वगळण्यावर 10 ला सुनावणी

नगर :  पुढारी वृत्तसेवा : रेखा जरे हत्याकांडातील बाळ बोठे याला फरार असताना कोणतीही मदत केली नसल्याने, गुन्ह्यातून वगळण्याच्या मागणीचा अर्ज आंध्र प्रदेशातील तीन आरोपींनी न्यायालयात केला आहे. या मागणीवर 10 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपींवर आरोप निश्चितीची प्रक्रिया या अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे.  राजशेखर अजय चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहेमान अब्दुल आरिफ (तिघेही रा. आंध्र प्रदेश) या आरोपींनी पत्रकार बाळ बोठे याला फरार असताना कोणतीही मदत केली नाही. तसेच, आमचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे आम्हाला गुन्ह्यातून वगळण्यात यावे, अशी मागणी केली होती.

या मागणीवर रेखा जरे यांचे चिरंजीव रूणाल जरे यांच्या वतीने काम पाहणारे अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी हरकत घेतली होती. दि.28 रोजी झालेल्या सुनावणीत आरोपींना गुन्ह्यातून का वगळण्यात येऊ नये, यावर सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेतले असून, आरोपींना गुन्ह्यातून वगळण्यात यावे किंवा नाही याचा निकाल येत्या 10 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. यादवराव पाटील व त्यांचे सहायक अ‍ॅड. सचिन पटेकर काम पाहत आहेत.

गैरहजर आरोपींना फटकारले
याप्रकरणी दि.28 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीला आरोपी क्र.7 जनार्दन अकुला व आरोपी क्र.9 राजशेखर अजय चाकाली हे दोन आरोपी गैरहजर होते. न्यायालयाने गैरहजर राहणार्‍या आरोपींना फटकारत सर्व आरोपींना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Back to top button