संगमनेर : शेतकर्‍याला व्यापार्‍याची मारहाण प्रकरणी बाजार समितीच्या गेटवर दोन तास आंदोलन | पुढारी

संगमनेर : शेतकर्‍याला व्यापार्‍याची मारहाण प्रकरणी बाजार समितीच्या गेटवर दोन तास आंदोलन

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो विक्रीसाठी आलेल्या रणखांबच्या शेतकर्‍यास टोमॅटो व्यापार्‍याने मारहाण केल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह शेतकर्‍यांनी सुमारे दोन तास संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट बंद आंदोलन केले. अखेर पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतरच सदरचे गेट बंद आंदोलन मागे घेण्यात आले. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील रणखांब येथील शेतकरी किरण शिवाजी बारवे हे आपल्या शेतातील टोमॅटो घेऊन बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटो मार्केटमधील व्यापारी आयुब सय्यद यांच्याकडे गेले. त्या ठिकाणी आयुब पठाण यांची गाडी उभी होती. शेतकरी बारवे यांनी तुमची गाडी थोडी पुढे घ्या, असे आयुब पठाण यांना म्हणाला. याचा राग पठाण याला आल्याने त्यांनी शेतकर्‍यास शिवीगाळ केली.

त्यानंतर जवळ असलेला त्याचा नातेवाईक अरबाल आयुब पठाण यांनी त्याची गच्ची पकडून त्यास लाथा बुक्यांनी मारहाण केली. ‘आम्ही कुरणचे आहे आमच्या नादी लागू नको, तुला जीवे ठार मारून टाकू’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटो मार्केटमध्ये पठार भागातील शेतकर्‍याला मारहाण झाल्याची माहिती समजतात युवासेनेचे तालुकाप्रमुख गुलाब भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद पवार, महिला तालुकाप्रमुख शितल हासे, पप्पू कानकाटे, साहेबराव हासे, रणजीत ढेरंगे यांच्यासह शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटजवळ जमा झाले.
सुमारे अर्धा ते एक तास गेट बंद आंदोलन केले. जोपर्यंत शेतकर्‍याला मारहाण करणार्‍या दोघांवर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि गेट बंद आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी घेतला होता.

या आंदोलनाची माहिती समजताच पोलिस उपाधीक्षक राहुल मदने आणि संगमनेर शहराचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. शेतकर्‍याला मारहाण करणार्‍यांवर तात्काळ गुन्हा दाखल करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी गेट बंद आंदोलन मागे घेतले. याबाबत किरण बारवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आयुब पठाण व अरबाल पठाण या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शेतकर्‍यांना दादागिरी केल्यास सेनास्टाईलने उत्तर
येथून पुढील काळात जर बाजार समितीत शेतकर्‍यांवर व्यापार्‍यांनी दादागिरी केली तर ते खपवून घेतले जाणार नाही. जो व्यापारी शेतकर्‍यांवर दादागिरी करेल, त्याला शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा युवा सेनेचे तालुकाप्रमुख गुलाब भोसले यांनी दिला.

Back to top button