सैराट फेम प्रिन्स उर्फ सुरज पवारला दिलासा | पुढारी

सैराट फेम प्रिन्स उर्फ सुरज पवारला दिलासा

राहुरी; पुढारी वृत्तसेवा :  सैराट फेम प्रिन्स उर्फ सुरज पवार यास पोलीस चौकशीमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. बँक खात्यांसह इतर दस्ताऐवज पाहता पोलिसांकडून एक प्रकारे क्लिनचिट मिळाली. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी फसवणूक प्रकरणात पवार याचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महेश बाळकृष्ण वाघडकर या तरूणाच्या तक्रारीनंतर दत्तात्रेय अरूण क्षीरसागर (रा. नाशिक) यासह आकाश विष्णू शिंदे व ओंकार नंदकुमार तरटे (दोघे रा.संगमनेर) विजय बाळासाहेब साळे (रा. खडांबे ता. राहुरी) यास अटक केल्यानंतर पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. अनेक तरूणांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आम्हालाही नोकरीच्या अमिषाने फसवणूक केल्याचे सांगितले.

दरम्यान, या प्रकरणामध्ये आरोपींकडून पोलिसांना दिलेल्या जबाबात प्रिन्स उर्फ सुरज पवार याचे नाव घेण्यात आले होते. शिक्के बनविण्यासाठी प्रिन्सने शॉर्ट फिल्मचे कारण सांगितल्याचे सांगण्यात आले होते. सैराट चित्रपटात भूमिका साकारणार्‍या अभिनेत्याचे नाव प्रकरणात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे व पोलीस उपनिरीक्षक सज्जन नर्‍हेडा यांनी पवार यांच्याशी संपर्क साधत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. दीपक शामदिरे यांसह सुरज पवारने उपस्थित राहूनत कागदपत्रांसह सर्व पुरावे सादर केले. पवारने आपले तीन ते चार वर्षांपासूनचे बँक खात्याचे सर्व तपशिल तसेच डॉ. डेरे यांच्या संविधान चित्रपटाबाबतचे सर्व कागदपत्रे सादर केली. नोकरी फसवणूक प्रकरणी अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यांमध्ये कोणत्याही तक्रारदारांनी पवार यांचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे नोकरी फसवणूक प्रकरणात पवार यांचा सहभाग पोलिसांना आढळून आलेला नाही. त्यानुसार पोलिसांकडून एकप्रकारे पवार यांना क्लिनचिट मिळाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा;

Back to top button