श्रीगोंद्यात ग्रामस्थांच्या सतर्कतेने अपहरण करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

श्रीगोंद्यात ग्रामस्थांच्या सतर्कतेने अपहरण करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

काष्टी वार्ताहरः श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज (आनंदवाडी) येथील इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या समर्थ गणेश यादव यास स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये पळवून नेत असल्याचा संशय आल्याने ग्रामस्थांनी दोन जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. नासिर गुलाब पठाण (वय २८, रा, काष्टी.ता.श्रीगोंदा) आणि हरिभाऊ दत्तू वाळुंज (वय २७, रा. पिंपळगाव तुर्क, ता.पारनेर) असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात या दोघांनवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील अजनुज (आनंदवाडी) येथील समर्थ गणेश यादव (वय वर्षे ११) हा रयत शिक्षण संस्थेच्या काष्टीमधील जनता विद्यालयात इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे. बुधवार २८ सप्टेंबर रोजी शाळेमध्ये सकाळी ९:३० वाजता चित्रकला स्पर्धा असल्याने शाळा लवकर सुटली. त्यानंतर त्याने यशोदा क्लासमध्ये एक तास पूर्ण केला आणि घरी जाण्यासाठी अजनुज चौकात येऊन थांबला. तिथे बिना नंबरची स्विफ्ट डिझायर गाडी येऊन थांबली. गाडीत असलेल्या नासिर गुलाब पठाण याने तुला कुठे जायचे आहे? असे समर्थला विचारले. आम्ही तुझ्या पप्पांचे मित्र आहोत असे सांगत, त्याला गाडीत बसविले.

त्यांनतर त्यांनी अनोळखी दोघांना गाडीत बसवून गणेशा व माळवाडी येथे सोडले. मला पुढे घेऊन जात असताना खरातवाडी येथे गाडी आल्यावर हरिभाऊ दत्तू वाळुंज याने गाडीत असलेला चाकू दाखवला. आरडा ओरडा केला तर, चाकू पोटात खुपसून टाकेल असा सज्जड दम दिला. त्यानंतर पुढे रस्त्यावर मोठा खड्डा आल्याने गाडीचा स्पिड कमी झाला. नंतर तात्काळ समर्थ यादव याने गाडीतून उडी टाकली आणि रस्त्या लगत असलेल्या अशोक वाघमोडे यांच्या घरी गेला. त्यांना माझ्या वडिलांना फोन करा असे सांगितले. वाघमोडे यांनी लगेच त्याच्या वडिलांना फोन केला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्याच्या वडिलांनी आनंदवाडी येथील मित्र महेंद्र गिरमकर यांना या गाडीबाबत माहीती दिली.

गणेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, काष्टी सिद्धटेक रोडवरील आनंदवाडी फाटा येथे महेंद्र गिरमकर व त्यांच्या दहा ते पंधरा सहकाऱ्यांनी गाडी अडवली. चौकशी केली असता सदर गाडीत मद्य धुंद अवस्थेत असलेल्या तरुणांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. यामुळे सखोल चौकशी केली असता गाडीमधे चाकू, दारूच्या बाटल्या, ग्लास, चकणा, आठ ते दहा वेगवेगळ्या प्रकारच्या नंबरप्लेटा आणि महाराष्ट्र शासन नाव असलेल्या दोन पाट्या मिळून आल्या.

सदर आरोपी खरे बोलत नसल्याने ग्रामस्थांना राग आला आणि त्यांनी त्यांना बेदम चोप दिला. श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फोन करून सदर आरोपी नासिर गुलाब पठाण व हरिभाऊ दत्तू वाळुंज या दोघांना स्विफ्ट डिझायर गाडीसह ताब्यात दिले. यामुळे लहान मुले अपहरण करणारी टोळी पकडल्याची चर्चा श्रीगोंदा तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आरोपींना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. आरोपींना पकडण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रमेश गिरमकर, सरपंच सुदाम नलवडे, माजी सरपंच पांडुरंग यादव सुभाष खोडदे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ मुलांनी सहकार्य केले. मुलाचे वडील गणेश विठ्ठल यादव यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे करीत आहेत.

Back to top button