पारनेर : बातमीनंतर दुय्यम निबंधकांकडून मागवला खुलासा | पुढारी

पारनेर : बातमीनंतर दुय्यम निबंधकांकडून मागवला खुलासा

शशिकांत भालेकर: 

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : ‘पारनेर दुय्यक निबंधक कार्यालयाचा अंदाधुंदी कारभार’ या मथळ्याखाली दैनिक ‘पुढारी’मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली. यामुळे पारनेरचे प्रभारी पदभार असलेल्या दुय्यम निबंधक पदावरील अधिकार्‍याला हटवून, दुसर्‍या प्रभारी अधिकार्‍यांकडे या कार्यालयाचा पदभार देण्यात आला. तूर्तास प्रभारी दुय्यम निबंधकांची तात्पुरती नेमणूक केली असून, लवकरच कायमस्वरुपी दुय्यम निबंधकांची नेमणूक केली जाईल, असे जिल्हा निबंधक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी एस. बी. झोटिंग यांनी सांगितले.  कार्यालयात साखळी पद्धतीने नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली जाते. दलालांची कामे प्राधान्याने केले जाते. यामुळे अनेकांना हेलपाटे मारावे लागतात. या तक्रारी वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्या.

तुकडे बंदी नियमाचे सर्रास उल्लंघन होऊन नोंदवले गेलेल्या प्रकरणांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यामुळे तडकाफडकी संबंधित अधिकार्‍याचा पदभार काढून घेऊन दुसर्‍या अधिकार्‍याकडे देण्यात आला; मात्र कार्यालयात असणार्‍या दलालांचा वावर, काही कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यालयात काम करत आहेत. त्यांच्यावर कोणतेही बंधन नसून ते खुलेआम दलालांना सहकार्य करत असल्याच्या तक्रारी आहेत. यावर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता लागली. तसेच, कायमस्वरुपी दुय्यम निबंधक मिळावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

प्रभारी राज संपवा!
पारनेर येथे गेल्या काही कालावधीपासून दुय्यम निबंधकाचा पदभार हा प्रभारीकडे दिला जात आहे. त्यामुळे कार्यालयात अंदाधुंदी कारभार, सर्वसामान्यांची पिळवणूक होते. कर्मचारी व दलालांचे साटेलोटे होते. कायमस्वरुपीचा सक्षम अधिकारी नसल्याने हा प्रकार वाढतो. त्यासाठी प्रभारी राज संपवून कायमस्वरुपी दुय्यम निबंधक मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

‘ठोस कारवाई व्हावी’
संबंधित दुय्यम निबंधकांच्या निलंबनाची मागणी, ‘आम्ही केली होती. अनेक प्रकरणांमध्ये गैरव्यवहार झाला, याची कसून चौकशी केली जावी यापूर्वीही या कार्यालयाचा प्रभारी चार्ज दिला गेला. येणार्‍या अधिकार्‍याकडून गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्याला येथून पुन्हा जिल्हा कार्यालयात नेमणूक दिली जाते; मात्र त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. ती झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे, असे अमोल ठुबे म्हणाले.

Back to top button